अतुल कुलकर्णी, मुंबईसार्क देशांची ‘टुरिझम समिट’ औरंगाबाद येथे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरुन परत आल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नवे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी लोकमतशी बोलताना दिली.पदभार घेतल्यानंतर रावल म्हणाले, सार्क समिटच्या निमित्ताने सात देशातील पयर्टन मंत्री आपल्याकडे येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी यावे असे आपले प्रयत्न आहेत. ‘टुरिझम समिट’मुळे आपल्याकडील अनेक चांगल्या गोष्टी अन्य देशापुढे मांडता येतील. शिवाय, देशातंर्गत आणि देशाबाहेरचे पर्यटक यांची विभागणी करुन कोणते पर्यटक कशासाठी येतील याची नियोजन विभागातर्फे केले जाईल, असेही ते म्हणाले.पर्यटन विभागासाठी काय काय करता येईल याविषयी आपली आणि मुख्यमंत्र्यांची गेले तीन चार महिने चर्चा सुरु होती. त्यादृष्टीने आपण या विभागासाठीची एक ब्ल्यू प्रिंटही तयार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याजवळचे खाते दिल्यामुळे खूष असलेले रावल विभागाची माहिती घेण्यात मग्न झाले आहेत. धुळ्याहून औरंगाबादमार्गे येताना पर्यटनाच्या कोणकोणत्या सोयी आहेत याची माहिती अनेकदा घेतली आहे, त्या भागात काय आहे आणि काय नाही याची आपल्याला चांगली कल्पना आहे, असे सांगून ते म्हणाले, करण्यासारखे खूप काही आहे. महाराष्ट्रात येणारे पर्यटक मुंबईमार्गे अन्य राज्यात न जाता याच राज्यात कसे थांबतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.नाशिक येथे धार्मिक, औरंगाबादेत ऐतिहासिक, मुंबईत व्यावसायिक पर्यटन, अशा पर्यटनाच्या राजधान्या करण्याच्याही कल्पना आपल्या मनात असून त्या दृष्टीने नियोजन केले जाईल असेही रावल यांनी यावेळी सांगितले. आपण रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देण्यासाठी अन्य राज्यात भेटी दिल्या होत्या. त्या दृष्टीने एक अहवालही सादर केला होता. तो अहवाल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांना खूप आवडला होता. आता रोजगार हमी योजनेचे खातेच आपल्याला मिळाले आहे त्यामुळे खूप काही करता येईल असेही रावल कौतुकाने सांगत होते.
औरंगाबादेत ‘सार्क टुरिझम समिट’ घेणार!
By admin | Updated: July 13, 2016 03:50 IST