मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये १ हजार ७७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आणि ६३२ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोटनिवडणूक २५ जुलै रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २३ जिल्ह्यांमधील ७ हजार १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १ हजार २१२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक ४ आॅगस्टला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज ही माहिती दिली. या निवडणुकींच्या निमित्ताने राज्याचे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार आहे. सत्तारूढ भाजपा-शिवसेनेची ग्रामीण भागात किती पकड आहे हे सिद्ध होईल. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्ता गेल्यानंतर होत असलेली ही पहिली मोठी निवडणूक असल्याने या दोन्ही पक्षांना नव्याने उभारी मिळते काय याबाबत उत्सुकता असेल. अनेक ठिकाणी ही निवडणूक पक्षीय चिन्हांवर लढली जात नसली तरी स्थानिक राजकारण पक्षापक्षांमध्ये विभागलेले असते. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित प्रभागांत आज रात्री १२पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकालानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या पाच तालुक्यांत मात्र दुपारी ३ पर्यंत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्हाधिकारी स्थानिक सुटी जाहीर करतील. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी २७ जुलै रोजी; तर दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी ६ आॅगस्ट रोजी होईल. (विशेष प्रतिनिधी)
ग्रामीण राजकारण ढवळून निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 01:47 IST