मुंबई : राज्यातील परिवहन कार्यालयांत ‘नो एन्ट्री’चा बोर्ड लावण्यात आल्याने संतापलेल्या आसपासच्या दलालांनी संप पुकारला आहे. दलालांनी आपली दुकानदारी बंद ठेवण्याबरोबरच झेरॉक्स मशीन आणि अन्य स्टेशनरीची दुकानेही बंद ठेवली आहेत. परंतु आरटीओत कामासाठी येणाऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही मार्गदर्शनासाठी नियुक्ती करण्यात आली होती.गेल्या काही वर्षांत राज्यातील आरटीओंना दलालांचा मोठ्या प्रमाणात विळखा बसला आहे. आरटीओ कार्यालयातील कामकाजात दलालांची लुडबुडदेखील सुरू झाली आहे. हे पाहता १७ जानेवारीपर्यंत आरटीओ दलालमुक्त करा, असे थेट आदेशच परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी या कार्यालयांना दिले. त्याचप्रमाणे १९ जानेवारीपासून आरटीओंना अचानक भेट देण्यात येणार असून, दलाल आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीदही आयुक्तांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओ अधिकऱ्यांचे धाबे दणाणले असून, दलालांना प्रवेश देऊ नये यासाठी अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांनाही खास सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दलालांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करू नये, यासाठी आरटीओत कामानिमित्त येणाऱ्यांची कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जात होती. कामानिमित्त येणाऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्येक आरटीओत दोन निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याचीदेखील नेमणूक करण्यात आली होती. तर दुसरीकडे मुंबईतील वडाळा, ताडदेव आणि अंधेरी या आरटीओंबाहेर दुकान मांडून बसणाऱ्या दलालांनी आपली दुकानदारी बंद ठेवली होती. आरटीओ कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांचे हाल करण्यासाठी तर दलालांंच्या ‘दुकानदारी’नजीक असणारी झेरॉक्स आणि स्टेशनरीची दुकानेही बंद करण्यात आली होती. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या अनेकांचे हाल होत होते. राज्यातील सर्व आरटीओंबाहेर हीच परिस्थिती असल्याचे आरटीओतील सूत्रांकडून सांगण्यात आले. छायाचित्रकारास धक्काबुक्कीदलालांना आरटीओत प्रवेश नाकारल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. याचा प्रत्यय सोमवारी अंधेरी आरटीओबाहेरच दिसून आला. एका वर्तमानपत्राचा छायाचित्रकार आरटीओ कार्यालयाबाहेर वावरणाऱ्या दलालांचा फोटो काढत असताना त्यांना दलालांकडून धक्काबुक्की करण्यात आली.मेन गेटवरच बंदोबस्त ठेवला आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनीही सतर्क राहावे, यासाठी आम्ही सूचना केल्या आहेत. - पी. जी. भालेराव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरीदलालांना कुठल्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांनाही विशेष सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे कामानिमित्त येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही कर्मचाऱ्यांचही नियुक्ती केली आहे. - बी. आय. अजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळाच्परिवहन आयुक्तांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना १२ जानेवारी रोजी आरटीओत दलालांना नो एन्ट्री देण्याचे एक पत्रच धाडण्यात आले आणि त्यानंतर लायसन्स प्रक्रियेवरच त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. च्जानेवारी १२ तारखेला ताडदेव आरटीओत ३४४ लर्निंग तर परमनन्ट लायसन्स १६३ देण्यात आले. १९ जानेवारी रोजी हेच काम पाहिले असता लर्निंग २७७ आणि १९ परमनन्ट लायसन्स देण्यात आले. च्अंधेरी आरटीओत १२ जानेवारी रोजी लर्निंग लायसन्स ४१२ आणि परमनन्ट लायसन्स १९२ देण्यात आले. तर १९ जानेवारी रोजी लर्निंग ३७४ आणि परमनन्ट लायसन्स ५७ देण्यात आले. च्वडाळा आरटीओत १२ आणि १९ जानेवारी रोजी लर्निंग आणि परमनन्ट लायसन्सचे वाटप करण्यात आले नाही.
आरटीओचे कामकाज ठप्प
By admin | Updated: January 20, 2015 02:20 IST