सातारा जिल्ह्यामधील सावरी गावात सापडलेल्या ड्रग्ज कारखान्या प्रकरणी सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, हे गाव राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापासून जवळच असून या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भावावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
याबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरु होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही. एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा एमडी ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
तसेच माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा होऊन तीन दिवस झाले पण अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही व अटकही केलेली नाही. लिलावती रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे, आणि चोराच्या दिमतीला पोलीस ठेवले आहेत. शिक्षा ठोठावताच तात्काळ कारावई केली पाहिजे होती पण कारवाई ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच केली जाते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.