मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये बांधकाम सुरू असलेले गृह व व्यावसायिक प्रकल्प तसेच सीसी मिळालेल्या प्रकल्पांवरील स्थगिती उच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली. मात्र परवानगी न मिळालेल्या प्रकल्पांवरील स्थगिती न्यायालयाने कायम ठेवली आहे.याप्रकरणी डोंबिवलीतील कौस्तुभ दत्तात्रय गोखले, राजन सीताराम सामंत व कल्याण येथील सदानंद त्र्यंबक फणसे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. कल्याण येथील आधारवाडी डंम्पिंग ग्राउंड बेकायदा असून, त्याचा वापर बंद करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याची दखल घेत न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाने गेल्या महिन्यात १३ तारखेला या महापालिकेच्या हद्दीतील नवीन बांधकामांना स्थगिती दिली होती. तसेच आधारवाडी डंम्पिंग ग्राउंडला नेमके कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित करीत याची जबाबदारी निश्चित करावी, असे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले होते.मात्र ही बंदी हटवण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले. या बंदीमुळे कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पावर गदा आली आहे. महापालिकेने संपूर्ण शहानिशा करूनच सीसी जारी केले आहे. तेव्हा सीसी मिळालेल्या व बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांवरील बंदी उठवावी, अशी मागणी या बांधकाम व्यावसायिकांनी केली होती.
कल्याण-डोंबिवलीतील काही बांधकामांना दिलासा
By admin | Updated: May 6, 2015 03:40 IST