ठाणे : ठाणे, नवी मुंबई तसेच मीरा-भार्इंदर भागातील पर्यावरण खात्याशी संबंधित तसेच सीआरझेडने बाधित असलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या पुनर्बांधणीसाठी ग्रीन सिग्नल दर्शविल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. विचारे यांनी पर्यावरणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर या वेळी चर्चा केली. या तीनही शहरांना चोहोबाजूंनी खाडीने व्यापले आहे. खाडीकिनारपट्टीवर सुमारे २५ ते ४० वर्षांपासून राहणाऱ्या ठाण्याच्या येथील कोपरी परिसरातील जुन्या इमारतीमधील व मीठबंदरवरील कोळीबांधवांची घरे ही सीआरझेडमध्ये बाधित असल्याने त्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही. यासाठी पर्यावरण खात्याची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. पुनर्बांधणी रखडल्याने आज ना उद्या आपली इमारत कोसळेल. परंतु, या शहरात राहण्यासाठी खिशाला परवडेल, असे घर मिळू शकत नसल्याने त्याच घरात हे रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन राहत असल्याची परिस्थिती या भागाची आहे. जर त्यांना पुनर्बांधणीसाठी पर्यावरण खात्याने मंजुरी दिली तर त्यांना त्याच जागेवर हक्काचे घर मिळू शकेल, असे मत त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत व्यक्त केले. नवी मुंबई येथील सिडकोने विकसित केलेल्या इमारती आता धोकादायक झाल्याने व कोळीबांधवांचे वाडे, संकुले त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या काही जागा या सीआरझेडमध्ये असल्याने त्यांचा विकास होऊ शकला नाही. यासंदर्भातही या वेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार
By admin | Updated: July 10, 2015 03:04 IST