मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच राहावे, यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती तूर्तास रखडल्याचे चित्र आहे.
बावनकुळे यांनी शनिवारी पक्षाच्या तीन समित्यांची घोषणा केली. प्रदेश संघटनपर्व समिती, प्रदेश शिस्तपालन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान समिती अशा या तीन समित्या आहेत.
प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात २१ डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले असून, या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली.
प्रदेश शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी नागपूरचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी आमदार अतुल शाह, योगेश गोगावले, किशोर शितोळे हे चार सदस्य या समितीमध्ये असतील.
प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस प्रा. राजेश पांडे व प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दिल्लीला रवाना- चंद्रकांत पाटील हे २०२२ मध्ये मंत्री होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते. ते मंत्री होताच दोनच दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.- मात्र, यावेळी बावनकुळे १५ डिसेंबरला मंत्री झाले तरीही नवीन अध्यक्षांची नियुक्ती पक्षाने केलेली नाही. बावनकुळे यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत अध्यक्ष ठेवावे, यासाठी काही नेते आग्रही असल्याचे म्हटले जाते.- मात्र, ‘एक व्यक्ती, एक पद’ या पक्षाच्या नियमानुसार बावनकुळे यांच्या जागी नवीन अध्यक्ष तातडीने नेमावेत, असा दबावही आहे. बावनकुळे हे रविवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. नवीन प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ते पक्षनेतृत्वाशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष निवड कधी?प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया राबविणे किंवा पक्षनेतृत्वाने प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करणे, असे दोन पर्याय पक्षाकडे आहेत.१२ जानेवारी रोजी शिर्डीत भाजपचे अधिवेशन होत असून, त्या आधी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करणार की चार महिन्यांनी त्यांना अध्यक्ष करणार, याबाबत उत्सुकता आहे.