मुंबई : एका तरुणीला गाणे शिकविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार चारकोपमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी एका आॅर्केस्ट्रॉ गायकाला अटक केली आहे.प्रदीपचंद्र श्रीवास्तव (४०) असे अटक करण्यात आलेल्या गायकाचे नाव आहे. लहान-मोठ्या आॅर्केस्ट्रामध्ये गायक असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पीडित मुलगी ही सिक्कीमची राहणारी असून सिंगापूरमध्ये कार्यरत होती. गाण्याची आवड असल्याने कांदिवलीच्या न्यू म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या श्रीवास्तवशी २०१५मध्ये सोशल साईट्सच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली. त्यानुसार त्यांच्यात मेसेजेस आणि फोनवर बोलणे सुरू होते. देशात, देशाबाहेर स्टेज शोचे आयोजन करत असल्याचे त्याने पीडित मुलीला सांगितले. तुलाही गाणे शिकवून गाण्याची संधी मिळवून देईन, असे आमिषही त्याने तिला दाखवले. त्यानुसार ही तरुणी २ सप्टेंबरला सिक्कीमला परतली आणि त्यानंतर काही दिवस तेथे राहिल्यानंतर तिने १९ सप्टेंबरला मुंबई गाठली. वांद्रे येथे राहत असलेल्या बहिणीकडे ती पोहोचली. गाणे शिकण्यासाठी आल्याचे तिने बहिणीला सांगितले. रविवारी, २२ सप्टेंबर रोजी श्रीवास्तवला भेटण्यासाठी ती कांदिवलीला आली. त्या वेळी त्याने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. कांदिवलीतून ती वांद्रे येथील बहिणीच्या घरी पोहोचली. घडलेला प्रकार तिने बहिणीला संगीतला. त्यानुसार तिच्या बहिणीने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. ही तक्रार चारकोप पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. ही माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत श्रीवास्तवला अटक केली. श्रीवास्तव विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. बलात्कारप्रकरणी त्याला स्थानिक न्यायालयाने २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती चारकोप पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
गाणे शिकविण्याचे आमिष दाखवून बलात्कार
By admin | Updated: September 27, 2016 03:08 IST