गिरीश जोशी - मनमाड (नाशिक)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिमिक्री चांगल्या पद्धतीने करता येते. त्यांनी राजकारण सोडून चित्रपट क्षेत्रत यावे. त्यांना चित्रपट मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा उपाहासात्मक टोला अभिनेत्री राखी सावंत हिने शनिवारी लगावला.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे ती एका कार्यक्रमासाठी आली होती. राखी म्हणाली, राज यांच्या नावापुढे ‘ठाकरे’ हे नाव लागले असल्याने आपण जास्त बोलणार नाही. त्यांच्या नावासमोरील ठाकरे हा शब्द काढून घेतल्यास काहीच शिल्लक राहाणार नाही.
निवडणूक प्रचारासाठी कलाकारांना उतरवले जाते याबाबत बोलताना राखी म्हणाली की, नेत्यांच्या भाषणाला नागरिकांची जास्त गर्दी होत नाही. या उलट एखादा कलाकार बोलावला तर त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. त्यातून पक्षाचे, उमेदवाराचे विचार लोकांर्पयत पोहोचताती. ज्या पक्षाचे विचार त्याला पटतील, त्याला तो कौल देईल, असे तिने सांगितले.