- मनोज मुळ्ये
लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : उद्धवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांना लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेसेनेतील प्रवेशाची ऑफर होती. त्यांनी येण्याची तयारीही दर्शवली हाेती. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि आपल्याला मंत्रीपद मिळेल, या आशेतून त्यांनी प्रवेश केला नसावा, असे मत राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले.
राजन साळवी यांचा भाजपातील प्रवेश लांबला आहे. याबाबत रत्नागिरी येथे प्रतिक्रिया देताना आमदार सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राजन साळवी शिंदेसेनेत प्रवेश करणार होते. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल आणि त्यानंतर आपल्याला मंत्रीपद मिळेल, अशी आशा त्यांना असावी. पण तसे घडले नाही, असे आमदार सामंत म्हणाले.
गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्यासोबत जाण्यास कोणीही तयार नाही. किंबहुना ते ज्या पक्षात जातील, तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येतील, असेही आमदार सामंत यांनी राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर सांगितले.