डिप्पी वांकाणी, मुंबईअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला तुरुंगाच्या ज्या खोलीत ठेवले जाईल तेथे छोटे रुग्णालयच तयार करता येईल का अशी शक्यता पोलीस तपासून बघत आहेत. राजनच्या जिवाला मुंबईत त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीकडून असलेला धोका आणि दिवसाआड त्याला करावे लागत असलेले डायलेसिस लक्षात घेऊन हे छोटे रुग्णालय तुरुंगाच्या खोलीत उभारावे लागू शकते. वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ते छोट्या रुग्णालयाचा हा पर्याय विचारात घेत आहेत. छोटा राजनच्या मूत्रपिंडाचा आजार खूपच गंभीर झाला असून, त्याला एक दिवसाआड डायलेसिस करावे लागते, असे सूत्रांनी सांगितले. राजनला रुग्णालयात न्यायच्या प्रत्येक दिवशी संरक्षण देणे हा काही आमच्यासाठी चांगला पर्याय नाही. या अडचणीवर आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही. डायलेसिसची उपकरणेच तुरुंगात आणणे हा चांगला पर्याय होऊ शकतो का हे आम्ही तपासून बघत आहोत, असे हा वरिष्ठ अधिकारी म्हणाला. दुसऱ्या एका अधिकाऱ्यानुसार, दाऊदच्या लोकांनी त्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. राजनवर त्यांना हल्ला करायचा असेल तर त्याला कोणत्या वेळी नेले जाते याच्या वेळांवर ते लक्ष ठेवून असतील. २६/११च्या हल्ल्यातील अजमल कसाब यालादेखील सुरुवातीला बनावट नावाने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते. नैमित्तिक आजार असेल तर त्याला रुग्णालयात थेट नेणे शक्य आहे; परंतु नियमितपणे उपचार घ्यावे लागतात तेव्हा त्याला प्रवास करायला लावणे योग्य नसते.
राजनसाठी तुरुंगातच औषधोपचार
By admin | Updated: October 31, 2015 01:44 IST