Raj Thackeray With Maha Vikas Aghadi: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसे संकेत दोन्ही पक्षातून दिले जात आहे. त्यात संजय राऊतांनी राज ठाकरेमहाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे म्हटल्यानंतर या चर्चेला आणखी हवा मिळाली. त्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, मनसेच्या 'इंजिना'ची दिशा ठरल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे रईस शेख, आमदार जयंत पाटील यांच्यासह इतर नेतेही यावेळी उपस्थित होते.
राज ठाकरेंचं मविआसोबत जाण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल?
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या या भेटीने नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यावेळी उद्धव ठाकरे मविआ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता राज ठाकरेचं महाविकास आघाडीसोबत येण्याच्या दिशेने पावले पडत असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरे काँग्रेससोबत येण्यास इच्छुक असल्याचे विधान केल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी नकारात्मक सूर लावला होता. पण, आजच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीने महाविकास आघाडीत आणखी एक पक्ष येणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
मतदारयांद्यातील चुकांवर ठाकरेंचे बोट
दोन ठिकाणी मतदारांची नावे कशी आहेत? मतदारयांद्यामध्ये प्रचंड घोळ आहे. वडिलाचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, हे अनेक ठिकाणी घडले आहे. निवडणूक जाहीर झालेली नाही, तरीही मतदार नोंदणी बंद का केली गेली आहे? ज्यांनी १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदान करायचं नाही का? असे सवाल राज ठाकरेंनी या भेटीवेळी केले.
उद्धव ठाकरेंनीही निवडणूक अधिकाऱ्याचे काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी खोटं मतदान झाले आहे. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.
Web Summary : Uddhav Thackeray and Raj Thackeray met MVA leaders and election officials. Speculation swirls about Raj Thackeray joining the Maha Vikas Aghadi after hints and Sanjay Raut's statement. Their meeting with the election commissioner sparks discussions about MNS's future direction.
Web Summary : उद्धव ठाकरे और राज ठाकरे ने एमवीए नेताओं और चुनाव अधिकारियों से मुलाकात की। राज ठाकरे के महा विकास अघाड़ी में शामिल होने की अटकलें संजय राउत के बयान के बाद तेज हो गई हैं। चुनाव आयुक्त के साथ उनकी बैठक से मनसे की भविष्य की दिशा पर चर्चा शुरू हो गई है।