शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. एक दिवस सकाळी उठलो आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर समजेचना असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता. तसंच त्यांनी नक्कलही करून दाखवली होती. यावर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
"राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काहीच जमत नाही. त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं. एकेकाळी आपले निवडून आलेले १४ आमदार आपल्याला सोडून का गेले? नुसती भाषणं करून जनतेचा आणि रोजीरोटीचा प्रश्नही सुटत नाही. ते खुप पलटी मारतात. आताच्या केंद्रातील सरकार विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका आपण पाहिली," असंही अजित पवार म्हणाले.
"सर्वधर्मसमभाव ही भूमिका स्वीकारली""शरद पवार त्यांच्या परीनं साबत आहेत, दिवस रात्र काम करत आहेत. लोकांना मार्गदर्शन करतायत, चांगला विचार मांडतायत तरी त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं असं म्हणतात. कोणीही सांगावं त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. त्यांनी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत सर्वधर्म समभाव हीच भूमिका स्वीकारली," असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे?मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता.