राज ठाकरेंनी दिली ‘मोदीमुक्त’ भारताची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:30 AM2018-03-19T05:30:52+5:302018-03-19T05:30:52+5:30

देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य देशाला मिळायला हवे. गुजरात सोडून बाकीच्या राज्यांचा नरेंद्र मोदी दुस्वास करतात.

Raj Thackeray gave a 'Modi-free' call to India | राज ठाकरेंनी दिली ‘मोदीमुक्त’ भारताची हाक

राज ठाकरेंनी दिली ‘मोदीमुक्त’ भारताची हाक

Next

मुंबई : देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य देशाला मिळायला हवे. गुजरात सोडून बाकीच्या राज्यांचा नरेंद्र मोदी दुस्वास करतात. लोकांची सतत फसवणूक करणारे हे सरकार आता घालवायलाच हवे. २०१९ साली ‘मोदीमुक्त’ भारत करण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. देशाला झालेला हा आजार घालवायलाच हवा. त्यासाठी मोदींविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी लोकांची निव्वळ फसवणूक करत आहेत. देशाला दिलेले एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. न्यायसंस्थेपासून माध्यमांपर्यंत सर्वांची मुस्कटदाबी केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपविण्यात येत आहे. देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणीच लादली आहे. २०१४ पूर्वी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताचे आवाहन केले होते. महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असेल, तर आता ‘मोदीमुक्त’ भारतासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले.
देशातील आणि राज्यातील भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. लोकांना सांगण्यासारखे यांच्याकडे काही उरले नाही. त्यामुळे २०१९ साली निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुस्लीम धार्मिक दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रश्नावर सुनावणी सुरू आहे. २०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही सुनावणी पुढे सरकेल, याची व्यवस्था भाजपाकडून केली जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर बरोबर हे घडेल. राम मंदिराचा विषय घडला की, ताबडतोब दंगली घडवा, अशी चर्चादेखील या मंडळींनी काही मुस्लीम संघटनांशी केल्याचा गंभीर आरोप, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. राम मंदिर झालेच पाहिजे, पण तुमच्या राजकारणासाठी दंगली घडवून नको. निवडणुकीनंतर मंदिर झाले तरी चालेल, असे राज म्हणाले.
यापूर्वीही महाराष्ट्रासह इतरत्र जातीय संघर्षाचा कट रचला जात असल्याचे मी सांगितले होते, तसेच भाकीत दाऊदबद्दल केले होते. मी काही राजकीय भविष्य सांगत नाही, पण राजकारणाबाबत माझे निश्चित ठोकताळे असतात. जातीय संघर्ष, दाऊदबद्दल ते खरे ठरले. आता या मंडळींनी हिंदू-मुस्लीम दंगलीचा डाव आखला आहे. तो उधळून लावण्यासाठी सर्वांनी जागरूक राहायला हवे, असेही राज म्हणाले.
देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आता तर बेरोजगारांची नोंद ठेवण्याचे कामच सरकारने बंद केले आहे. अमित शहा तर पकोडे म्हणजे वडे विकणे, हासुद्धा रोजगार असल्याचे म्हटले. मग मोदी इतके दिवस जगभर वड्याचे पीठ आणायला फिरत होते का? परदेश दौºयातून गुंतवणूकच आली नाही, असे राज म्हणाले.
नीरव मोदी ११ हजार कोटी घेऊन पळाला, हे लोकांनी विसरावे म्हणूनच अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू माध्यमात मोठा करण्यात आला. असे कोणते क्रांतिकार्य श्रीदेवीने केले होते, ज्यामुळे त्यांचा मृतदेह हा राष्ट्रध्वजात, तिरंग्यात नेण्यात आला, असा सवालही राज यांनी केला.
>हिटलरचे तंत्र
माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे. न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य गेले. एकेक यंत्रणा खिळखिळी केली जात आहे. हे सगळे हिटलरच्या तंत्रावरच सुरू आहे. हिटलर नीट वाचला, तर याचा खुलासा लगेच होईल. प्रत्येक जण सरकारबद्दल नाराज आहे. देशभरात अस्वस्थता आहे. लोकांपर्यंत सरकारविरोधी बातम्या येऊ नयेत, याची काळजी घेतली जात आहे.
>कॅनेडियन ‘भारतकुमार’
‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’सारखे सरकार पुरस्कृत सिनेमे सध्या येत आहेत. अक्षयकुमार दुसरा मनोजकुमार, भारतकुमार झालाय. रोज आपल्याला भारत प्रेमाचे धडे देतोय, पण हा अक्षयकुमार कुठे भारतीय आहे, त्याचा पासपोर्ट कॅनडाचा आहे.
राज्यातले सगळे प्रश्नच संंपले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाण्यांचे व्हिडीओ बनवू लागले आहेत. मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला मॉनिटर. शिक्षिकांचा आवडता, पण विद्यार्थ्यांचा नावडता. हे अर्थमंत्री तर रजनीकांतचा बारावा डम्मी वाटतात.
शेतकºयांची शेती काढून घेतली जात आहे. त्याचा मोबदला दिला जात नाहीये. दलाल राज्य करत आहेत. समृद्धी वगैरे प्रकल्पात तेच सुरू आहे. या दलालांमुळे धर्मा पाटील या शेतकºयाला आत्महत्या करावी लागली.

Web Title: Raj Thackeray gave a 'Modi-free' call to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.