ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान कोपरी ब्रिजजवळ रेल्वेमार्गात काम करीत असलेल्या महादेव तांबडी (५३) या रेल्वे कर्मचाऱ्याचा सोमवारी दुपारच्या सुमारास उपनगरी रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सायं. ३.३० ते ४ वा.च्या सुमारास काही काळ रेल रोको करून आपला संताप व्यक्त केला.ठाणे स्थानकातून सुटलेल्या अप सीएसटी या उपनगरीय गाडीने ट्रॅकमध्ये इतर कामगारांसह रेल्वेमार्ग देखभालीचे काम करीत असलेल्या तांबडी यांना २.१० वा.च्या सुमारास उडविले. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराने संतापलेल्या गँगमन रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारत दुपारी ३.२५ वा.ची आसनगावला जाणारी उपनगरीय लोकल आधी रोखून धरली. त्यानंतर, ठाण्याहून मुंबईकडे आणि ठाणे ते कल्याणला जाणाऱ्या गाड्याही रोखून धरल्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बराच वेळ उपनगरी वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर, पुन्हा ४ च्या सुमारास फलाट क्र.२ वर निदर्शने करीत या घटनेचा निषेध केला. कर्मचाऱ्यांनी याच अनुषंगाने आपल्या विविध मागण्याही रेल्वे प्रशासनाकडे लावून धरल्यामुळे या तणावात आणखीनच भर पडली. दर महिन्याला अशा प्रकारच्या अपघातांत असे किमान दोन कर्मचारी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा धिक्कार करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने या वेळी लावून धरली. (प्रतिनिधी)
रेल्वे कामगाराचा मृत्यू
By admin | Updated: December 16, 2014 03:34 IST