अहमदनगर : ‘रेल्वेचा मोफत प्रवास करू दिला नाही, तर भारतात बॉम्बस्फोट घडविले जातील,’ असा मजकूर असलेले धमकीचे पत्र मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास नगर स्थानकातील रेल्वे प्रशासनाच्या हाती पडले. यामुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. मात्र, धमकीचा हा प्रकार खोडसाळपणा असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मंगळवारी दुपारी पोस्टमनच्या हातून रेल्वेमास्तर यांच्या नावे असलेले बंद लिफाफ्यातील पत्र रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाले. हे पत्र उघडल्यानंतर रेल्वे प्रशासनाची धांदल उडाली. रेल्वेमास्तर यांच्या नावे असलेल्या या पत्रात म्हटले आहे, अयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी शिवसेना-भाजप या पक्षाशी संबंधित रोहिदास भालेराव आणि रामदास भालेराव हे रेल्वेतून प्रवास करीत आहेत. त्यांना तिकिटाबाबत कोणी अडवाआडवी केली, तर संपूर्ण भारतात कुठेही बॉम्बस्फोट घडविले जातील. पत्राच्या खाली रोहिदास भालेराव असे नाव लिहिलेले आहे. ‘खासदार दिलीप गांधी आणि भाजपा-शिवसेना आमदारांकडून सावध राहण्याबाबत कळविण्यात येत आहे,’ असे पत्राच्या सुरुवातीलाच म्हटले आहे. हे पत्र हाती पडताच रेल्वेच्या स्थानिक प्रशासनाने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, दुपारी स्थानिक गुन्हे शाखा, नगर पोलीस, बॉम्बशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. त्यांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची झडती घेतली. नगर रेल्वे स्थानकामधून जाणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची चौकशी केली. रेल्वे ब्रीज, ओव्हर ब्रीजवरही तपासणी केली. यामुळे दुपारी रेल्वे स्थानकावर एकच तारांबळ उडाली होती. पत्र लिहिणारा व्यक्ती मनोरुग्ण असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. एखाद्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमकीचे रेल्वेला पत्र
By admin | Updated: March 2, 2016 03:31 IST