मुंबई : नेहमीप्रमाणे याही रविवारी मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आणि त्यांना मोठ्या मनस्तापालाही सामोरे जावे लागले. मध्य रेल्वेमार्गावर भायखळा ते विद्याविहारदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.२0 ते ३.२0पर्यंत ब्लॉक घेतला गेला. त्यामुळे या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. डाऊन जलद मार्गावर धीम्या लोकल गाड्यांना परेल, दादर, माटुंगा सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबा देण्यात येत होता. मात्र डाऊन जलद मार्गावरील प्रवाशांचा यामुळे गोंधळ उडत होता. काही स्थानकांवर उद्घोषणा होत नसल्याने तसेच इंडिकेटर्सचाही बोऱ्या वाजल्याने प्रवाशांना लोकल सेवा समजत नव्हती आणि त्यामुळे लोकल पकडताना प्रवाशांचा गोंधळ उडत होता. हार्बर मार्गावरील लोकल तर रद्दच करण्यात आल्या होत्या. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येत होत्या. मात्र अशी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. (प्रतिनिधी)
रेल्वे मेगाब्लॉकने केले प्रवाशांचे हाल
By admin | Updated: June 23, 2014 03:50 IST