सांगली : कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित रुद्रगौडा पाटील याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्यासह काही साधकांच्या शोधासाठी शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरजेसह जत तालुक्यात छापे टाकले. पण हाती काहीच लागले नाही.मडगाव येथे २००९मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सांगलीत पत्रकार म्हणून काम केलेला मलगोंडा पाटील हा ठार झाला होता. मलगोंडा हा रुद्रगौडा पाटीलचा चुलत भाऊ आहे. स्फोटानंतर तो फरार झाला होता. कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक केल्यानंतर रुद्रगौडा पाटील पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचाही हत्येमध्ये सहभाग असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरज व जत तालुक्यात छापे टाकले. मृत मलगोंडा पाटील याच्या काराजनगी येथील घरीही पोलीस जाऊन आले असल्याचे समजते. यासंदर्भात पोलिसांकडे विचारणा केली. परंतु त्यांना हा तपासाचा भाग आहे, आम्हाला काहीच माहिती देता येत नाही, असे सांगून अधिक भाष्य करण्यास टाळले. रुद्रगौडा पाटीलच्या संपर्कात आलेल्या काही साधकांवर पोलिसांची नजर ठेवली आहे. त्यांचाशी शोध सुरु ठेवला आहे.ज्योतीचा जबाब नोंदविलाज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी समीर गायकवाड याची प्रेयसी ज्योती कांबळे हिला शनिवारी अटक न दाखविता तिचा कायदेशीर जबाब नोंदविला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. समीरच्या संकेश्वर येथील जवळच्या दोघा नातेवाइकांची चौकशी करून त्यांना घरी पाठविल्याचे तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.तिघांचेही मारेकरी एकाच विचारांचे -मुक्ता दाभोलकरसोलापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी एकाच विचारांचे आहेत, असे मत अंधश्रद्धा निर्र्र्मूलन समितीच्या अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. करमाळा येथे सर्वोदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानमालेनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलीस योग्य दिशेने सुरू असून, तपासाबाबत आम्ही समाधानी आहोत, यातून नक्कीच खरे गुन्हेगार समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगली, मिरजमध्ये छापे
By admin | Updated: September 20, 2015 00:16 IST