जितेंद्र कालेकर,
ठाणे- ‘चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि.’ या खासगी कंपनीचा कर्मचारी अमोल कार्ले याने एसएमएसद्वारे सिग्नल दिल्यानंतरच १० जणांच्या टोळक्याने संपूर्ण तयारीनिशी दरोडा घातल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान, याच टोळीतील तीन जणांनी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्याकरिता गोव्याहून बंगलोरकडे पलायन केल्याचे समजते. त्यांच्या शोधासाठी ठाणे पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘चेकमेट’वर नऊ कोटी १६ लाखांचा दरोडा पडला, त्या वेळी अमोल हा कंपनीतील अन्य १६ कर्मचाऱ्यांबरोबर होता. मंगळवारी पहाटे २.३० ते ३ वा. या वेळात दरोड्याच्या जय्यत तयारीत असलेल्या टोळीला तोच कंपनीतील हालचालींची बित्तमबातमी देत होता. दरोड्यानंंतरही तो टोळीतील सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात होता. त्यालाही वारंवार फोन येत होते. चौकशीच्या दरम्यान त्याने उलटसुलट उत्तरे दिल्याने तो खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस एन.टी. कदम आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे किशोर पासलकर यांच्या जाळ्यात अलगद अडकला. बाजूच्याच इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो नोटांचे बंडल असलेले बॅरल घेऊन जाण्यासाठी दरोडेखोरांना मदत करण्यात आघाडीवर होता. या सर्व बाबींमुळे त्याच्याबद्दल संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइलची तपासणी केली, तेव्हाच तो गांगरला. दरोड्याच्या दिवशी काही तास अगोदर दरोडेखोरांपैकी एकाने ‘कधी येऊ?’ अशी विचारणा करणारा एसएमएस अमोलला केला होता व तो पोलिसांना मिळाला. त्याने कंपनीत प्रवेश करण्याचा सिग्नल दिल्यानंतरच सशस्त्र टोळीने आत शिरकाव केला. दरोड्यानंतरही सकाळी ८ ते १० वाजण्याच्या दरम्यान पळालेले दरोडेखोर त्याच्या संपर्कात होते. ‘निघालास का?’, ‘कधी येतोय?’ अशी विचारणा एसएमएसद्वारे अमोलकडे होत होती व त्यावर ‘इकडे बडे पोलीस अधिकारी येताहेत, मला वेळ होईल,’ अशी माहिती तो त्यांना संदेशाद्वारे देत होता, हे तपासात उघड झाले. आतापर्यंत नऊ आरोपींना पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून सहा कोटी ५१ लाख रुपये हस्तगत केले आहेत. >आरोपींचे बंगलोरला पलायनदरोड्यातील आणखी काही आरोपी एक ते दोन कोटींच्या रकमेसह गोव्याला असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. शनिवारपासून पोलिसांचे एक पथक तिकडे गेले होते. परंतु, आपल्या मागावर पोलीस असल्याची कुणकुण लागताच या टोळक्याने गोव्यातून बंगलोरला पलायन केले, असे पोलिसांनी सांगितले.लुटीनंतर बहिणीचा वाढदिवसदरोड्यात अटक केलेल्या नितेश आव्हाड याच्या बहिणीचा २९ जून रोजी वाढदिवस होता. लुटीनंतर तो कल्याणमधील त्याच्या बहिणीकडे गेला. पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच त्याला अटक केली. त्याच्याकडून ४५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.