चाहत्याची अशीही श्रद्धा : घरालाही दिले नाव मंगेश व्यवहारे- नागपूरअसे म्हणतात देव कुणी पाहिला, पण अनेकांना माणसातच देव दिसतो. एखाद्या माणसातही अनेकांना देवत्व दिसते. त्यांच्या स्वरांतून अमृताचा वर्षाव व्हायचा...त्यांच्या गायनातून परमेश्वराचेच स्वरुप जाणवायचे. त्यांचा देह लौकिकार्थाने संपला पण स्वर अमर आहेत. त्यांच्या चाहत्यांची तर त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा, यातूनच उपराजधानीतील एका चाहत्याने चक्क आपल्या देवालयातच त्यांना स्थान दिले. धन्य ती भक्ती, धन्य तो देव. आपल्या मधाळ आवाजाने अवघ्या देशाला वेड लावणारे मोहम्मद रफी यांचे देशभरात अनेक चाहते आहेत. पण नागपूरचे शिवकुमार प्रसाद यांची मो. रफींवरची श्रद्धा नतमस्तक करायला लावणारी. आज मोहम्मद रफी आणि त्यांचा हा चाहता दोघेही हयात नाही. जोपर्यंत संगीत क्षेत्रात मोहम्मद रफींचे नाव राहणार, तोपर्यंत या चाहत्याचाही मान राहणार, हे निश्चित. सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांचे देशभरात लाखो चाहते आहेत. मात्र शिवकुमार यांचे त्यांच्याप्रती असलेले आकर्षण, समर्पण, प्रेम काही विलक्षणच. ते मोहम्मद रफींचे प्रचंड मोठे चाहते होते. रफी साहेबांचे गीत त्यांच्या जीवनाचा एका भाग झाला होता. त्यांची पहाट आणि रात्र रफींच्या गाण्याने होत होती. असा कुठलाही दिवस गेला नाही की, त्यांनी रफींचे गाणे ऐकले नाही. ते रफींना देवासमानच बघायचे. रफींच्या आवाजाचा वेडा असलेल्या या चाहत्याने, १९८७ मध्ये सादिकाबाद परिसरात घर घेतले आणि घराला रफी सदन असे नाव दिले. ९० च्या दशकात त्यांचे घर परिसराचा लॅण्डमार्क होते. त्यानंतर घरात त्यांनी मंदिर बांधले. या मंदिरात देवी देवतांबरोबरच मोहम्मद रफी यांना स्थान दिले. नियमित पूजा करायचे. त्यांच्या आईने याला विरोध केला होता. मात्र रफी साहेबांच्या भक्तीत मग्न झालेल्या शिवकुमार यांनी आईच्या भावनांचा फारसा विचार केला नाही. त्यांनी स्वत:चा कधी वाढदिवस साजरा केला नाही. मुलांच्या वाढदिवसांच्या तारखा त्यांना लक्षात नसायच्या. मात्र, मोहम्मद रफी यांचा जन्मदिन आणि पुण्यतिथी ते कधीही विसरले नाही. या दोन्ही दिवशी ते उपवास ठेवायचे. आपल्या घरीच संगीताचा कार्यक्रम आयोजित करायचे. शहरातील मोठमोठ्या लोकांना बोलावून, रफींच्या गीतांची मैफल सजवायचे. त्यांनी मोहम्मद रफी सांस्कृतिक संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेअंतर्गत महोम्मद रफींच्या गीतांचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले.
देव्हाऱ्यात रफी साहब!
By admin | Updated: July 31, 2014 01:11 IST