मार्गासनी : वेल्हे तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत वेल्हे येथे १०५ मि.मी., तर अंबवणे येथे ९६ मी.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार वनश्री लाभशेटवार यांनी दिली.वेल्हे गुंजवणी धरण परिसरात जोरदार पाऊस पडल्याने पाणीपातळीत किंचीत वाढ झाली आहे. सकाळापासून पावसाची रिमझिम कमी-अधिक प्रमाणात चालू होती. दुपारी पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी, रात्री व पहाटे पडणाऱ्या सरींमुळे एका दिवसात वेल्हे येथे १०० मि.मी. चा आकडा ओलांडला. या अगोदर कमी-अधिक प्रमाणात पडणारा पाऊस व जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाने संपूर्ण तालुक्याचा परिसर व्यापला असून, तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतात पाणी साठल्याने भातलावणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाने चांगली सुरुवात केली असल्याने वेल्ह्यातील शेतकरीवर्ग सुखावला आहे. भातखाचरे हळूहळू पाण्याने भरू लागली आहेत. नदी, ओढे, नाले थोड्याफार प्रमाणात वाहू लागले आहेत. तालुक्यातील निसर्गसौंदर्य पावसाने नटून निघाले असून, फेसाळणारे धबधबे, धुके, हवेत गारवा वाढल्याने पर्यटकांची गर्दी वाढली.संपूर्ण जून महिन्यात वेल्हे तालुक्यातील वेल्हे मंडल येथे १५० मि.मी., अंबवणे येथे १०० मि.मी. तर पानशेतमध्ये ८२ मि.मी., विंझर मंडल येथे ८५ पावसाची नोंद झाली होती. परंतु जुलै महिन्यात सुरुवातीला पहिल्याच तारखेला पावसाने दमदार हजेरी लावत एका दिवसात वेल्हे येथे १०५ मि.मी, विंझरला ७६ मिमी., अंबवणेत ९६ मि.मी. तर पानशेत येथे ३९ मि.मी पावसाची नोंद झाली.
वेल्ह्यात चोवीस तासांत मुसळधार
By admin | Updated: July 4, 2016 01:32 IST