मुंबई : भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी बंद करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने घेतल्यानंतर आता या चौकशीसाठी याचिका करणारे नाशिक येथील विष्णु मुसळे यांनीही तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी एसीबीला पाठविले असून, त्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. मुसळे यांचे वकील उदय प्रकाश वारूंजीकर यांनी ही माहिती न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाला दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. डॉ़ गावित हे आमदार होण्याआधी शिक्षक होते़ त्यांचा भाऊ शरद गावित हा चतुर्थ श्रेणी कामगार होता़ त्या वेळी त्यांचे उत्पन्न हजारोंमध्ये होते़ आता त्यांचे उत्पन्न कोट्यवधींच्या घरात गेले आहे़ याच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुसळेंनी केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीचे आदेश दिले होते. खुल्या चौकशीत एसीबीला काहीच सापडले नाही. त्यामुळे त्यांनी तपास बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुसळे यांनीही संबंधित तक्रार मागे घेण्याचे पत्र एसीबीला धाडले.
गावितप्रकरणी तक्रारदाराने घेतली माघार
By admin | Updated: June 24, 2015 02:13 IST