मुंबई: राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर आहेत. प्राध्यापकांच्या एमफुक्टो संघटनेनं पुकारलेल्या या संपात 25 हजार प्राध्यापकांचा सहभाग आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचं मानधन वाढवावं, अभ्यास मंडळांमधील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ दूर करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकीत ७१ दिवसांचं वेतन मिळावं या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.प्राध्यापकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर काल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक होणार आहे. राज्यभरातील प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. यासाठी प्रमुख संघटनांना बोलावण्यात आलं असलं, तरी बेमुदत संपावर ठाम असल्याची माहिती एमफुक्टोचे मधू परांजपे यांनी दिली. एमफुक्टो संघटनेच्यावतीनं त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. याआधी संघटनेकडून राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली होती. याशिवाय ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संपदेखील करण्यात आला होता. मात्र या आंदोलनाची शासनानं काहीच दखल न घेतल्यानं त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती पुटाचे (पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशन) अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी दिली. दरम्यान यापूर्वी संघटनेनं ७१ दिवसांचा बेमुदत संप केला होता, त्यावेळी त्याला कमी पाठिंबा मिळाला होता. त्याचबरोबर शासनाने त्या ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना दिलं नव्हतं. त्यामुळे काही प्राध्यापक या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजपासून राज्यभरातील प्राध्यापक बेमुदत संपावर; 25 हजार प्राध्यापकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 10:28 IST