सांगली : पक्षांतर्गत वादाबाबत योग्यवेळी भूमिका जाहीर केली जाईल. विधानसभेसाठी यंदा सांगली मतदार संघातून माझ्याऐवजी पृथ्वीराज पवार निवडणूक लढवेल. त्याच्या उमेदवारीची शिफारस केल्याचे आ. संभाजी पवार यांनी (बुधवारी) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सांगलीतील नागरी प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आज आ. पवार महापालिकेत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. विधानसभेच्या उमेदवारीवरून सध्या भाजपअंतर्गत दोन गटात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याविषयी योग्यवेळी भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. यंदाची विधानसभा निवडणूक माझ्याऐवजी पृथ्वीराज लढविणार आहे, तशी मागणीही पक्षाकडे केली आहे, पक्षश्रेष्ठी त्याविषयीचा निर्णय घेतील, असे सांगून त्यांनी राजकीय परिस्थितीवर अधिक भाष्य करणे टाळले. नागरी प्रश्नांबाबत आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली. मोबाईल कंपन्यांनी शहरभर खुदाई केल्यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. कंपन्यांना दिलेली परवानगी, प्रत्यक्षात झालेले रस्त्यांचे नुकसान आणि दुरुस्तीसाठी येणारा खर्च याबाबतची चौकशी प्रशासनाने करावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, गेल्या वर्षभरात विकासकामे ठप्प आहेत. आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. चंदनाची २२ झाडेच आमराईत शिल्लक आहेत. यावर आयुक्त अजिज कारचे यांनी वृक्षगणनेसाठी यंदा ६0 लाखांची तरतूद केल्याचे त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
पृथ्वीराज पवार यांची विधानसभेसाठी शिफारस
By admin | Updated: May 8, 2014 12:31 IST