वाडा : तालुक्यातील बिलोशी येथील मयुरी पाटील या महिलेचा प्रसूती दरम्यान शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. तिचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड करीत डॉक्टरानांही बेदम मारहाण केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. बिलोशी येथील मयुरी पाटील यांना प्रसूतिसाठी शनिवारी (दि. १७) सकाळी खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास प्रसूती होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप इंगळे यांनी त्यांना वाडा येथे हलविण्यास सांगितले. रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी गाडी करून वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना ठाणे येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ठाणे येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळेच मयुरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मयुरीच्या नातेवाईकांनी आज दुपारी खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. त्यानंतर त्याचा जाब दिलीप इंगळे यांना विचारताच त्यांना मारहाण केली. व त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींची नावे सांगण्यास पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांनी नकार दिला. (वार्ताहर)
गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरला फटके
By admin | Updated: September 20, 2016 03:34 IST