लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ती जन्मायच्या आधीच वडिलांचे छत्र हरपलेले. त्यामुळे आईच्या कष्टाच्या सावलीतच ती वाढलेली. धुणीभांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आईचा अचानक अपघात झाला अन् सर्व जबाबदारी तिच्यावर पडली. पण, ती डगमगली नाही. मेन राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत शिक्षण घेत ती उद्यमनगरातील एका पेट्रोलपंपावर दिवसभर काम करायची. याच संघर्षाला तिने बारावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवत यशाची लख्ख झळाळी दिली. प्राची मनोहर लाखे असे या जिद्दी मुलीचे नाव.
यादवनगरात राहणाऱ्या प्राचीची आई चार घरचं धुणीभांडी करून कसतरी संसाराचा गाडा चालवते. त्यात आईचा एक छोटासा अपघात झाल्याने प्राचीवर मोठी जबाबदारी पडली. तिने सकाळच्या प्रहरी काॅलेज व सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत पेट्रोलपंपावर काम करणे सुरू केले. विशेष म्हणजे तिने एकही दिवस कॉलेज चुकवले नाही. नित्यनेमाने ती काॅलेजला यायची. तिने ७५ टक्के गुण घेत कॉलेजमध्ये कला शाखेत प्रथम येण्याचा मान तिने पटकावला. निकालाच्या दिवशीही प्राची पेट्रोलपंपावरच काम करत होती.
मुख्यमंत्र्यांचे वैभवीला पत्र
केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला. असे असले, तरी पित्याच्या हत्येच्या डोंगराएवढ्या दुःखातही लेकीने बारावीची परीक्षा दिली. आता याचा निकाल लागला असून, वैभवी देशमुख हिने विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली. या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यामुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण परिस्थितीमध्येही वैभवीने बारावीची परीक्षा दिली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला अभिनंदनपर पत्र लिहिले. हे पत्र अंबेजोगाई एसडीओंनी वैभवीला दिले. पत्रात म्हटले की, कठीण परिस्थितीत तू यश मिळवले. आज तुझे वडील असते तर त्यांना आनंद झाला असता! तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करत राहावीस, आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत.
माया ! शेतकरी मायबापानं पुण्यात पाठवलं, लेकीनं मिळविले ९५ %
पुणे : ती मूळची धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी गावाची. आई- वडील दोन्ही शेतकरी, वडिलांना बारावीत ६७ टक्के गुण मिळाले होते. वडिलांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती; पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र, मुलगी माया माने हिने वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करत फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावीत ९५ टक्के गुण मिळवले. वडिलांना जेव्हा बारावीचा निकाल फोनवर सांगितला, तेव्हा ते म्हणाले, खरंच! एवढे गुण मिळाले... आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहले. शैक्षणिक प्रवासासाठी पुण्यात आलेल्या मायाला दहावीत चांगले गुण मिळाले. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळाला. मायाचा प्रवास तसा खडतरच होता. आई- वडील विठ्ठलवाडी गावात शेती करतात. कोणताही खासगी क्लास नाही, फक्त पाठ्यपुस्तके, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयात होणारी दररोजच्या लेक्चरला उपस्थितीआणि अभ्यास करून तिने हे घवघवीत यश मिळवले. वसतिगृहात राहूनशिक्षण घेणाऱ्या मायाने अभ्यासात सातत्य ठेवले.