उपराजधानीत दिवसभर पावसाची रिपरिप नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील नागरिकांना हुलकावणी देणाऱ्या पावसाने मंगळवारी हजेरी लावली. दिवसभर सातत्याने पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खाते तसेच हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. विशेषत: विदर्भात भंडारा, गोंदिया या भागात अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे.मंगळवारी विदर्भात दिवसभर पाऊस सुरूच होता. गोंदिया येथे सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. नागपुरात दिवसभर थेंबथेंब पाऊस पडत होता अन् सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ७ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे तापमानातदेखील घट नोंदविण्यात आली. उपराजधानीचे कमाल तापमान सरासरीहून ३ अंशांनी कमी म्हणजे २६.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)सतर्कतेचा इशाराबंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र अशा दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस येऊ शकतो अशी शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांनीदेखील याला दुजोरा देत सखल भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे.
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
By admin | Updated: August 6, 2014 01:13 IST