मुंबई : आरे प्रशासनाच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे आरेतील अनेक रहिवासी मूलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. आरे येथील युनिट क्रमांक ३० येथील मोराचा पाडा येथील तुटलेल्या गटारातून रहिवाशांना दररोज पायपीट करावी लागत आहे. युनिट नंबर—३०मध्ये मोराचा पाड्यात सुमारे १५०० लोकवस्ती आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील गटारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील नागरिक नाइलाजाने या गटारावरून ये—जा करतात. तुटलेल्या गटारांचे लोखंडी गज पूर्णपणे उखडलेले आहेत. त्यामुळे रहिवासी जीव मुठीत धरून ये—जा करीत आहेत. येथील रहिवाशांसाठी हा मुख्य रस्ता असल्याने नाइलाजाने पादचारी आणि वाहनचालकांना या तुटलेल्या गटारांवरून जाणे भाग पडत आहे. या समस्येमुळे मयूरनगरातील रहिवासी त्रस्त असल्याची माहिती नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी दिली. याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही येथील गटारांची दुरुस्ती झालेली नसल्याची माहिती येथील महिलांनी दिली.आरे प्रशासनाच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आरेतील हजारो रहिवांसी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. यामुळे निधी असूनही लोकप्रतिनिधींना विकासकामे करता येत नाहीत. पावसाळ्यात तुटलेल्या आणि उघड्या झालेल्या गटारीमुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. (प्रतिनिधी)
आरेतील गटारे फुटली
By admin | Updated: July 4, 2016 02:29 IST