जळगाव : मी राजकारणातून निवृत्त होणार नसलो तरी समाजसेवेलाच यापुढे अधिक प्राधान्य राहील. यापुढे मतांचे राजकारण करणार नाही. नवीन चांगल्या लोकांना संधी देण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यांच्यासाठीच मते मागेन, असे मनोगत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.सकल जैन संघातर्फे गुरुवारी पांझरापोळ गोशाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर रत्नाभाभी जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सकल जैन संघपती दलूभाऊ जैन आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुरेशदादा जैन यांचा सत्कार करण्यात येऊन पुत्र राजेश जैन व कन्या मीनाक्षी जैन यांच्या हस्ते दादांना मिठाई भरविण्यात आली.मी घाबरणारा नाही!सुरेशदादा जैन म्हणाले, मी कधी घाबरणारा नाही. आता राजकारणात नवीन लोकांनी पुढे यावे असे मला वाटते. जीवनात खूप यश व कीर्ती मिळाली. या दरम्यान घराकडे दुर्लक्ष झाले. त्यावेळी माझी अर्धागिनी रत्ना जैन यांनी समर्थपणे साथ दिली. माझ्या यशात तिचा मोठा वाटा असून जनतेचेही आशीर्वाद कायम राहिले. जनतेलाच मी माझे कुटुंब मानले.
राजकारणातून निवृत्ती नाही आणि मतांचे राजकारणही - माजी मंत्री सुरेशदादा जैन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 02:11 IST