श्रीरामपूर (अहमदनगर) : जातीव्यवस्था संपवायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असून त्यासाठी केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. नवविवाहित जोडप्यांना अडीच लाख रुपयांची मदत सामाजिक न्याय विभागाकडून दिली जात आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.मराठा व दलितांचे ऐक्य महत्त्वाचे आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनादुरूस्ती करून आरक्षणाचा टक्का वाढवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दलित आरक्षणाला पाठिंबा असून संविधान कोणीही बदलू शकणार नाही. जेव्हा कोणी संविधान बदलेल तेव्हा देशाचे सरकार बदलेल, असा इशारा त्यांनी दिला.लोणी येथे विखे कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर आठवले यांनी श्रीरामपुरात पत्रकारांशी संवाद साधला. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत ते म्हणाले, हा कायदा रद्द होणार नसून त्याचा गैरवापर होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी चौकशी करताना कठोर निकष लावतील. निरापराधांवर असा गुन्हा दाखल होणार नाही, याची काळजी हे अधिकारी घेतील. (प्रतिनिधी)
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचे धोरण - रामदास आठवले
By admin | Updated: January 15, 2017 01:47 IST