- विवेक भुसे
पुणे, दि.20 - कोर्टाचे दडपण दूर करावे व साक्षीदाराची उजळणी व्हावी, या हेतूने पुणे ग्रामीण पोलीस दलाने अभिरूप कोर्ट रूम तयार केल्यामुळे शिक्षेच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष खटला सुरू होण्यास बराच काळ जातो़ दरम्यानच्या काळात अनेकदा साक्षीदाराला त्या गुन्ह्याची माहिती विस्मृतीत जाण्याची शक्यता असते़ त्याचबरोबर कोर्टामध्ये उभे राहून साक्ष देण्याचेही त्याच्यावर दडपण असते़ त्यातून साक्षीमध्ये विसंगती निर्माण होण्याची शक्यता असते़ त्याचा फायदा घेऊन आरोपीचे वकील साक्षीदारावर संशय निर्माण होईल, असा युक्तिवाद करून त्याची साक्ष ग्राह्य धरू नये, यासाठी प्रयत्न करतात़ त्याचा फायदा गुन्हेगाराला मिळून खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने लागल्याचे दिसून येते़ सत्र न्यायालयातील खटल्यांत शिक्षा लागण्याचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.याबाबत पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ़ जय जाधव यांनी सांगितले, की साक्षीदाराने न घाबरता साक्ष द्यावी व आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांना समर्थपणे उत्तरे द्यावीत, यासाठी त्यांना आवश्यक ती मदत करणे गरजेचे असल्याचे लक्षात आले़ त्यातूनच अभिनव कोर्टाची (मॉक कोर्ट) संकल्पना पुढे आली़ पुण्यातील पाषाण रोडवरील ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात कोर्टासारखेच कोर्ट रूम तयार करण्यात आली़ त्यात दोन्ही बाजूचे वकील, न्यायाधीश याची भूमिका पोलीस अधिकारी, कर्मचारी निभावतात. अशा प्रत्यक्ष कोर्ट रूममुळे साक्षीदाराला कोर्टात जशी साक्ष द्यायची आहे, त्याला आरोपीचे वकील काय प्रश्न विचारतील, याची उजळणी करुन घेतली जाते.प्रत्यक्ष खटल्यात साक्ष देण्याच्या काही दिवस अगोदर साक्षीदाराची उजळणी करुन घेतल्याने प्रत्यक्ष साक्ष देताना त्याला त्याचा फायदा होतो़ कोणत्याही दडपणाशिवाय तो चांगली साक्ष देऊ शकतो़. मॉक कोर्टचा उपक्रम सध्या पुणे व बारामती येथे राबविण्यात येत असून त्याचा चांगला उपयोग होत आहे़ साक्षीदाराला सराव झाल्याने तो व्यवस्थित साक्ष देऊ शकतो़ त्याचबरोबर साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण कमी झाले असून सत्र न्यायालयातील खटल्यामध्ये शिक्षा लागण्याचे प्रमाण १८ टक्क्यांवर गेले आहे. तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडील खटल्यात शिक्षा लागण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर गेले आहे.- डॉ़ जय जाधव, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण