पुणे : बागेमध्ये दारूपित बसलेल्या मद्यपींना हटकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला चढवत मद्यपींनी दारूच्या बाटल्या आणि दगड फेकून पोलिसांना जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कसबा पेठेत घडली. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मआज अख्तर शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप अरुण राळे असे जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप राळे फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस आहेत. राळे आणि त्यांचे सहकारी पाटील शनिवारी रात्रपाळी असल्याने बीट मार्शल गस्तीवर होते. कसबा पेठेत असलेल्या आलोकनगरीच्या बाजूला नव्याने तयार होत असलेल्या उद्यानामध्ये काहीजण दारू पित बसलेले असतात, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे यांना मिळाली होती.त्यांच्या सूचनांनुसार राळे आणि पाटील गस्तीवर असताना उद्यानाबाहेर दुचाकी लावून उद्यानात गेले. तेव्हा स्मशानभूमीच्या भिंतीलगत असलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीजवळ तीन ते चार जण दारू पित बसलेले दिसले. राळे यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो हिसका देत भिंतीवरून उडी मारून पळाला. त्याने जाता जाता पोलिसांच्या दिशेने बिअरची बाटली फेकून मारली. ती बाटली राळे यांच्या कपाळावर लागली. अन्य दोघांनी त्यांच्यावर दगडफेक केली. राळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यामधून रक्त येऊ लागले होते. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.(प्रतिनिधी)
मद्यपींच्या हल्ल्यात पोलीस जखमी
By admin | Updated: October 10, 2016 01:49 IST