कल्याण : रामबाग परिसरात एका ठिकाणी सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक करडे यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी मनीष पाटील याच्यासह अन्य पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मनीष हा काँग्रेसच्या माजी नगरसेविका शारदा पाटील यांचा मुलगा आहे.पोलीस उपनिरीक्षक करडे हे नाकाबंदी करण्यासाठी पौर्णिमा चौक येथे जात होते. त्या वेळी रामबाग परिसरात काही तरुणांमध्ये वादावादी सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाद घालणाऱ्यांना ते समजावून सांगत होते. परंतु, तेथे उपस्थित असलेल्या मनीषने मी शारदा पाटीलचा मुलगा आहे. तू कोणत्या डिपार्टमेंटचा आहेस, तुझी नेमप्लेट दाखव, असे बोलत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांच्या गणवेशाची कॉलरही पकडण्यात आली. यात बटणे तुटली तसेच नेमप्लेट तुटून खाली पडली. तर मनीषच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्याबरोबर धक्काबुक्की केल्याने त्यांच्या गळ्यावर जखमा झाल्याचे करडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
पोलीस अधिका-याशी हुज्जत घालणा-यास अटक
By admin | Updated: April 20, 2015 02:33 IST