नंदुरबार/ शिंदखेडा (जि. धुळे) : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शतप्रतिशत भाजपा सरकार हेच पक्षाचे एकमेव ध्येय असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नंदुरबार व शिंदखेडा येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेप्रमाणे लवकरच पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भाजपाने राज्यातील प्रचाराचा प्रारंभ नंदुरबारमधील सभेने रविवारी केला. राज्याला दिवाळखोरीत काढणारे आघाडी सरकार आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय सरकार ठरले. घोटाळे आणि गैरव्यवहारांनी या सरकारच्या काळात उच्चांक गाठला गेला. त्यामुळे औद्योगिक विकासात राज्य पहिल्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर फेकले गेले, असा आरोप त्यांनी केला. बाबा व दादामुळे महाराष्ट्र खड्डयात गेल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका करत भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे आरोप केले. अमरावती-सुरत हा सात हजार कोटी खर्चाचा आणि संपूर्ण काँक्रीटीकरण असलेला चौपदरी महामार्ग केंद्राच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिंदखेडा येथे बोलताना, आघाडी सरकारने जातीपातीचे राजकारण केले आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली. इंदूर- मनमाड रेल्वे मार्गाबाबत पुढील वर्षी कामाला सुरुवात सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. चाळीसगाव (जि.जळगाव) येथेही सायंकाळी गडकरींची सभा झाली.
पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार
By admin | Updated: September 29, 2014 07:32 IST