शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

पु.ल. देशपांडे यांची जयंती

By admin | Updated: November 8, 2016 12:03 IST

साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!

-प्रफुल्ल गायकवाड

मुंबई, दि. 8 - साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
 
मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक, नाटककार आणि मराठी रंगभूमीशी व चित्रपटसृष्टीशी नट, संगीतकार, पटकथालेखक, दिग्दर्शक इ. नात्यांनी निगडित असलेले अष्टपैलू कलावंत. 
 
मुंबई येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षण मुंबई आणि पुणे येथे एम्. ए.; एल्एल्. बी पर्यत झाले. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ हे कवी आणि लेखक ; संस्कृत आणि बंगाली ह्या भाषांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता; रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा मूळ बंगालीतून अभंग गीतांजली हा पद्यानुवाद त्यांनी केला होता. त्यांच्या साहित्यप्रेमाचे, सहृदय विनोदबुद्धीचे संस्कार देशपांडे ह्यांच्यावर बालपणापासून झाले. पुढे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये ह्यांच्या सहवासातून अनुकमे नाट्य आणि संगीत ह्या क्षेत्रांकडे ते ओढले गेले. 'ललितकुंज’ ह्या नाट्यसंस्थेत काम करीत असता त्यांना प्रत्यक्ष चिंतामणरावांकडून अभिनयाचे धडे मिळाले. देशपांडे ह्यांचे बालपण मुंबई येथील विलेपार्ले या उपनगरात गेले. तेथील टिळकमंदिरात साहित्य-संगीत कलाविषयक कार्यक्रम आस्थापूर्व घडवून आणले जात. अशा उपक्रमांतून निर्माण होणाऱ्या संपन्न सांस्कृतिक वातावरणाचाही देशपांड्यांवर प्रभाव पडला. ते वीस वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर कारकून, शिक्षक, प्राध्यापक अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. पुढे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर मराठी नाट्यविभाग-प्रमुख, दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय नाट्यविभागाचे प्रमुख निर्माते, अशा विविध जबाबादाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
 
अभिरुची ह्या मासिकातून १९४३ च्या सुमारास त्यांनी लेखन करावयास आरंभ केला. त्यानंतर महत्त्वाच्या अन्य मराठी नियतकालिकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. लेखनाच्या जोडीने त्यांची नाट्योपासनाही चालू होतीच. नाट्यक्षेत्रातील यशामुळे चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. ह्या क्षेत्रात त्यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाला अधिक अवसर मिळाला. पुढचे पाऊल ह्या महाराष्ट्रात गाजलेल्या तमाशा-चित्रपटात त्यांनी नायकाची यशस्वी भूमिका केली. गुळाचा गणपती ह्या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचे कथा-संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका एवढ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या.
 
तुका म्हणे आता (१९४८) हे त्यांचे पहिले नाटक रंगभूमीवर अयशस्वी ठरले. तथापि त्यानंतर रशियन नाटककार निकोलाय गोगोल ह्याच्या द इन्स्पेक्टर जनरल (इंग्रजी अनुवाद) या नाट्यकृतीचे त्यांनी केलेले अंमलदार (१९५२) हे मराठी रूपांतर लोकप्रिय ठरले. त्यातील अंमलदाराची त्यांची भूमिकाही गाजली. यानंतरच्या तुझे आहे तुजपाशी (१९५७) ह्या नाटकाने यशस्वी नाटककार म्हणून त्यांचे स्थान निश्चित झाले. भाग्यवान (१९५३), सुंदर मी होणार (१९५८) आणि ती फुलराणी ही त्यांची अन्य नाटके. ही तिन्ही नाटके मूळ इंग्रजी नाटकांची मराठी रूपांतरे असली, तरी कथानकाची हाताळणी, त्याला स्वाभाविक मराठी रूप देण्याच्या दृष्टीने मूळ संवादांत आणि अन्य संदर्भांत केलेले मार्मिक बदल, मुळातील प्रसंगांना चढविलेला खास मराठी पेहराव ह्यांतून नाटककार म्हणून त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि शैलीचा प्रत्यय येतो. साधे, सुंदर, मार्मिक संवाद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे. ‘सारं कसं शांत शांत’, ‘छोटे मासे मोठे मासे’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘आम्ही लटिके ना बोलू’, ह्यांसारख्या एकांकिकांतूनही हे प्रत्ययास येते. वयम् मोठम् खोटम् आणि नवे गोकुळ ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली नाटके. पुढारी पाहिजे हे त्यांनी लिहिलेले लोकनाट्य प्रभावी ठरले. त्यात जनतेचे पुढारीपण करू इच्छिणारे विविध राजकीय पक्षांचे लोक आणि प्रत्यक्ष जनता ह्यांच्यातील दरी त्यांनी खेळकर, विनोदी पद्धतीने दाखवून दिली आहे.
 
अभिरुचीत त्यांनी १९४४ साली ‘भय्या नागपूरकर’ नावाचे एक लहानसे व्यक्तिचित्र लिहिले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली अनेक व्यक्तिचित्रे १९६२ साली व्यक्ति आणि वल्ली ह्या नावाने प्रसिद्ध झाली. मराठी समाजात–मुख्यतः मध्यम वर्गीय–पाहावयास मिळणाऱ्या नमुनेदार माणसांची ती जीवंत, प्रतिनिधिक चित्रे आहेत. ह्या पुस्तकास १९६५ मध्ये साहित्य अकादेमीचे पारितोषिक देण्यात आले. आपल्या आप्तांची, स्नेह्यांची तसेच विविध क्षेत्रांत त्यांना भेटलेल्या नामवंतांची त्यांनी काढलेली हृद्य शब्दचित्रे गणगोत (१९६६) आणि गुण गाईन आवडी (१९७५) मध्ये आहेत.
 
खोगीरभरती (१९४६), नस्ती उठाठेव (१९५२), बटाट्याची चाळ (१९५८), गोळाबेरीज (१९६०), असा मी असामी (१९६४) आणि हसवणूक (१९६८) हे त्यांच्या विनोदी लेखांचे संग्रह. 
 
मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात. मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत चालत आलेली विनोदाची परंपरा देशपांड्यांनी पुढे नेली व ती अधिक तरल, अभिरुचिसंपन्न, कलात्मक व आधुनिक बनविली. उपहास-उपरोध, विसंगती, वक्रोक्ती श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले, तरी त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो; कारण मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची ह्या विनोदाला जाण आहे; हास्याच्या कल्लोळात तो अश्रूंनाही हळुवार स्पर्श करतो. हासू-आसूंच्या ह्या हृदयंगम रसायनाने त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यात संस्कृतिटीकेइतकीच संस्कृतीच्या जपणुकीची ओढ आहे. देशपांड्यांची विनोदी लेखनाची शैलीही चतुरस्र, बहुढंगी आहे. प्राचीन महानुभाव गद्यापासून मर्ढेकरी शब्दकळेपर्यंतचे सारे ढंग तिने सहजपणे आणि सुभगपणे आत्मसात केलेले आहेत.
 
निरनिराळ्या कारणांनी त्यांना परदेशपर्यटनही घडले. त्यातून त्यांची अपूर्वाई (१९६०), पूर्वरंग (१९६५), जावे त्यांच्या देशा (१९७४) ह्यांसारखी प्रवासवर्णने लिहिले गेली. लहान मुलाच्या निरागस कुतूहलाने नवे देश आणि तेथील नवे अनुभव घेण्याची त्यांची दृष्टी यांतून दिसते. त्यामुळेच त्यांच्या प्रवासवर्णनांना ताजेपणा प्राप्त झाला आहे. ‘शांतिनिकेतना’त बंगालीच्या अभ्यासासाठी जाऊन आल्यानंतर लिहिलेली वंगचित्रे (१९७४) ही ह्याला अपवाद नाहीत.
 
त्यांनी १९६१ नंतर नोकरीपेशा कायमचा सोडला आणि विविध प्रकारचे नाट्यात्म कार्यक्रम सादर करण्याकडे ते वळले. बटाट्याची चाळ आणि असा मी असामी ह्या या दोन पुस्तकांवर आधारलेले त्यांचे एकपात्री प्रयोग ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय ठरतात. एकपात्री प्रयोगात एकाच व्यक्तीने अनेक पात्रांच्या भूमिका वठवावयाच्या असतात. देशपांड्यांच्या श्रेष्ठ अभिनयगुणांचा प्रत्यय त्यातून आलाच; परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम प्रथम त्यांनी प्रतिष्ठित केले, हे विशेष महत्त्वाचे आहे.
 
देशपांडे ह्यांनी जपलेली सामाजिक ऋणाची भावना त्यांच्या लहान मोठ्या कृतींतून दिसून येते. अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक साहाय्य केलेले आहे. राष्ट्रीय आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या वृद्ध्‌यर्थ त्यांनी ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’ स्थापन केले (१९६५). आपल्या कलागुणांवर मिळवलेल्या संपत्तीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यासाठी विनियोग करणारा कलावंत विरळा. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिराच्या उभारणीत त्यांचा सहभाग मोठा आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृतिमंडळाचे ते सदस्य आहेत आणि राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष व साहित्य अकादेमीचे सदस्य आहेत.
 
भारत सरकारने १९६६ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. १९६७ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ चे पारितोषिक देण्यात आले. १९६७ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना लाभला.
 
‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्‍या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे. 
 
सौजन्य : मराठी विश्वकोश व ईंटरनेट