विलास जळकोटकर ल्ल सोलापूरआमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’मधील रँचोसारखं भन्नाट काहीतरी करायचं या उद्देशानं पछाडलेल्या सोलापुरातल्या रोहन पवार, अनिल बंजारे, अक्षय हलकुडे, जगदीश दळवी, हिमांशू उमर्जीकर या पंचकाने बळीराजासाठी सौरऊर्जेवर चालणारं कीटकनाशक फवारणी यंत्र तयार करून शेतकऱ्यांचा आर्थिक भार सुसह्य केला आहे. एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत पदवीच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या या पाच जणांनी बाजारातून सुटे पार्ट घेतले. पाहता पाहता या चौघांच्या कल्पनेत असलेले सौरऊर्जेवर चालणारे कीटनाशक फवारणीयंत्र तयार झाले. सोलार स्प्रेमध्ये हेल्मेट आहे. या हेल्मेटमुळे शेतकऱ्यांचे उन्हापासून संरक्षण होऊ शकते आणि त्यावरच सोलार पॅनेल बसवले. सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले. द्रावणासाठी अवघे ५ किलो २०० ग्रॅम वजन असलेली फायबरची १६ लीटरची टाकी वापरली. हे उपकरण तयार करण्यासाठी ७ हजार ५०० रुपये खर्च आला. आगामी काळात याचे पेटंट बनवून माफक किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.फवारणी यंत्राची वैशिष्ट्येमोबाइल चार्जिंगसाठी सॉकेटची सोय, एफ. एम. रेडिओची सुविधा, हेल्मेटच्या वर एलईडी लाईट ज्यामुळे रात्रीही फवारणी करता येते. ड्रम पाठीवर घेणाऱ्या व्यक्तीसाठी आरामदायक व हवा खेळती राहील अशी सोय असणारे पॅड, पावसाळ्यात ऊन नसल्यास इलेक्ट्रिक चार्जिंगची सोय, उन्हात हेल्मेटवर सोलार पॅनल बसवल्याने हे यंत्र सलग चालते. ऊन नसताना सावलीत ५ तास बॅटरी बॅकअप मिळतो.
सौरऊर्जेवर होणार कीटकनाशक फवारणी
By admin | Updated: March 23, 2015 01:56 IST