लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाईसाठी मंगळवारी खातेनिहाय मदत जाहीर झाली. मात्र, शासनाने ७५ टक्केच मदत देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनुदान वाटपात खोडा निर्माण झाला आहे.
पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले. शनिवार आणि रविवारी सुटी असतानाही सगळी यंत्रणा ७५ आणि २५ टक्क्यांच्या दोन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात गुंतली होती. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन हेडखाली येणाऱ्या निधींचे वाटप करताना शेतकऱ्यांच्या खातेनिहाय दोन वेगळ्या याद्या कराव्या लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या खात्यावरही मदत जाण्यास विलंब होईल.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याला ३७६२ कोटी रुपयांतील ७५ टक्के म्हणजेच २८२१ कोटी रुपयांची रक्कम मिळेल. १०० टक्के अनुदान एकाच टप्प्यात देण्याची तयारी सुरू होती; परंतु त्या निर्णयात अचानक माशी शिंकल्यामुळे ७५ टक्केच अनुदान वाटप करण्याचा आदेश जारी करण्यात आला. परिणामी, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांवर नव्याने यादी तयार करण्याच्या कामाचा ताण वाढला. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे वाटप होणार आहे. एसडीआरएफच्या दराने २५८५ कोटींच्या मागणीच्या तुलनेत १९३९ कोटी, तर वाढीव ११७७ कोटी रुपयांच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात ८८२ कोटी असे २८२१ कोटी मिळतील. मराठवाड्यात ३५ लाख ३४ हजार जिरायती क्षेत्र हेक्टरसाठी ३५३४ कोटी, बागायत ६८ हजार ३९१ हेक्टरसाठी १०२ कोटी, ५० हजार १०९ फळपीक हेक्टरसाठी १२५ कोटी, असे एकूण ३६ लाख ५२ हजार हेक्टरसाठी ३७६२ कोटी एकूण मदतीपैकी २८२१ कोटी पहिल्या टप्प्यात वाटप होतील.
जिल्हानिहाय अशी मिळेल मदत औरंगाबाद : ५५५ कोटींच्या तुलनेत सुमारे ३७५ कोटी रुपये जालना : ५६६ कोटींच्या तुलनेत ३८० कोटी रुपये परभणी : ३४० कोटींच्या तुलनेत २५० कोटी रुपये हिंगोली : २९७ कोटींच्या तुलनेत २२५ कोटी रुपये नांदेड : ५६७ कोटींच्या तुलनेत ३८० कोटी रुपये बीड : ६६९ कोटींच्या तुलनेत ४७५ कोटी रुपये लातूर : ४४८ कोटींच्या तुलनेत ३४० कोटी रुपये उस्मानाबाद : ३१६ कोटींच्या तुलनेत २२५ कोटी रुपये
७५ टक्क्यांच्या तुलनेत अशी मिळणार मदत nजिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केले असून, ७५ टक्क्यांच्या तुलनेत ७५०० रुपये हेक्टरी मिळतील. nबागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५०, तर फळपिकांसाठी २५ हजार हेक्टरीच्या एकूण मदतीपैकी १८ हजार ७५० रुपये सोमवारपासून मिळतील.