भंडारा : नेत्यांविना निघणारे मराठा समाजाचे मोर्चे कौतुकास्पद आहेत. हे मोर्चे जनतेचे मोर्चे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताचा असून ज्या जातींना आरक्षण मिळत नाही त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी सांगितले.मध्य प्रदेशातील कटंगी येथे आंतरराष्ट्रीय भगवान बुद्ध महोत्सवात जाण्यापूर्वी भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाला १६ टक्के आणि अन्य समाजाला ९ टक्के असे २५ टक्के आरक्षण दिले पाहिजे. आरक्षणाचा विषय एकदाचा मार्गी लागला पाहिजे. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, या मताचा असलो तरी हा कायदा रद्द करावा, असे म्हणणे चुकीचे आहे. या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून हा विषय केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे कुणीही कितीही मार्चे काढले तरी अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मराठा मोर्चे जनतेचे - रामदास आठवले
By admin | Updated: October 18, 2016 05:20 IST