मुंबई : राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस, जीटी रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत. केवळ अतितत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. संपाच्या पाचव्या दिवशी तोडगा न निघाल्यामुळे परिचारिकेचा संप कायम असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना घरी पाठविण्यात येत आहे. रुग्णालयात आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही स्वत:हून डिस्चार्ज घेत आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयांतील वॉर्ड आणि अतितत्काळ विभागात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. त्यासोबत परिविक्षाधीन कालावधीतील काही परिचारिकांची मदत घेत रुग्णांना सेवा दिली जात आहे. दाखल असलेल्या रुग्णांवर त्याच्या नातेवाइकांवर सुश्रुषा करण्याची वेळ आली आहे.
डॉक्टरही त्रस्तपरिचारिका संघटनाचे प्रतिनिधींची वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत सोमवारी भेट झाली नाही. त्यामुळे काम बंद आंदोलन कायम ठेवण्यात आले. परिचारिकांअभावी रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरही त्रस्त झाले आहेत.