कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या हा ‘भाकप’च्या विचारधारेवरील हल्ला आहे. अंधश्रद्धा, जातिभेद निमुर्लनासाठी पानसरेंनी आयुष्य वेचले. धर्मनिरपेक्षता, समता या तत्त्वांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. त्याला विरोध करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींनीच त्यांची हत्या केली, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शमिम फैजी यांनी केला.पक्षाच्या २२ व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांनी उद्घाटन केले. फैजी म्हणाले, पानसरेंच्या निधनामुळे आम्ही दु:खी जरूर झालो आहोत, पण खचणार नाहीत. विचारांची ही लढाई नव्या प्रेरणेने आणि नव्या निर्धाराने सुरू करण्याचा निर्धार आम्ही या अधिवेशनात करत आहोत. पानसरेंच्या लढ्याला विरोध करणाऱ्या धर्मांध वृत्तीची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. याच प्रवृत्तींनी पानसरे यांची हत्या केली आहे, असे आमचे ठाम मत आहे. हत्येच्या निषेधार्थ ११ मार्चला पुरोगामी आणि डाव्या पक्षातील कार्यकर्ते मुंबईत महामोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य उदयन शर्मा म्हणाले, प्रतिगामी शक्ती सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बनाव रचत आहेत. तो रोखण्यासाठी आपल्याला केवळ राजकीय आघाडीवर काम करून चालणार नाही, तर सांस्कृतिक लढाईही लढावी लागेल. लाल निशाण पक्षाचे सुभाष गुरव, जनता दलाचे (सेक्युलर) शिवाजी परुळेकर यांचीही भाषणे झाली. ज्येष्ठ नेते दत्ता मोरे यांनी ध्वजारोहण केले. (प्रतिनिधी) .
धर्मांध प्रवृत्तींकडूनच पानसरेंची हत्या
By admin | Updated: February 23, 2015 02:40 IST