प्रताप नलावडे / बीड ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली असून गडावर फक्त किर्तन होईल, राजकीय भाषणबाजीला तेथे थारा मिळणार नाही, अशी भूमिका महंतांनी घेतली आहे.गत आठवड्यात शिरूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा यांनी भगवानगडाच्या विकासासाठी आपण एक पाऊल मागे येण्यास तयार आहोत, असे सांगत मी गडावर नको असेल तर माझा प्रतिनिधी पाठवते आणि त्यांच्यासोबत गडाच्या विकासासंंदर्भात चर्चा करावी, असे महंतांना सूचित केले होते. त्यावर नामदेवशास्त्री यांनी गडाला राजकीय आश्रयाची गरज नाही, गडाच्या विकासासाठी भक्तांचे पाठबळ भक्कम आहे, असे सांगत पकंजा यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीत भगवानगडाचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे. पंकजा यांनाही शास्त्रींनी गडाची कन्या मानले होते. परंतु त्यांनी गडावर राजकीय भाषण होणार नाही ही भूमिका घेतली तर पंकजा यांनी आपण गडावरच मेळावा घेणार असा हट्ट धरला होता. शेवटी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेत पंकजा यांनी आपले शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी पुढच्या वर्षी गडाचे महंत सन्मानाने आपल्याला गडावर बोलावतील, असे सूचक विधान करत नामदेवशास्त्री गडाचे महंत राहणार नाहीत, असा इशारा दिला होता. भगवानगडाचा विकास करण्यासाठी पंकजा एक पाऊल मागे येण्यास तयार आहेत तर याचवेळी शास्त्री राजकीय मंडळींपासून गडाला दूर ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
पंकजा, महंत वादात पडली पुन्हा ठिणगी
By admin | Updated: April 29, 2017 02:15 IST