बाळासाहेब बोचरे, भंडीशेगावकटेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या उत्कट ओढीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संत सज्जनांच्या पालख्या पंढरपुरात आल्या असून, सुमारे सहा लाखांच्या मांदियाळीने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे.पालखी मार्गाने आज संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चांगदेव, संत जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत सुमारे ६ लाख वैष्णव वाटचाल करीत आहेत.शेटफळ मार्गाने संत मुक्ताईची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे. तर संत एकनाथ व संत निवृत्तीनाथ करकंब पंढरपूरकडे झपझप पावले टाकत निघाले़माऊलींच्या पालखी सोहळ्यात ठाकुरबुवा समाधीजवळ झालेलं गोल रिंगण आणि बंधू सोपानदेवांची भेट हे महत्वाचे प्रसंग होते. संत तुकाराम महाराज पालखीचा आज वाटेगावजवळ धावा झाला. पाच पालख्या एकत्र आल्याने पंढरपूर, आळंदी या पालखी मार्गावर आजच मोठी भक्तीगंगा तयार झाली होती. विविध पालख्यांमधील वारकऱ्यांसाठी सर्व संतांच्या दर्शनाची मेजवानी होती. लाखो वारकरी या भागात जमले. वारकरी इतक्या मोठ्या संख्येने या भागात एकत्र आल्याने तसेच पाच पालख्यांची वाहने एकत्र आल्याने वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.‘सैराट’ चित्रपटातील आर्ची आणि परशा उद्या पालखी सोहळ्यात वाखरी येथे येणार असून, त्यांची सर्वत्र चर्चा होती. वाखरीच्या रिंगणात प्रचंड गर्दी आणि पोलीस यंत्रणेवर तणाव असतो. त्यात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली ही ‘सैराट’ जोडी येणार असल्याने पोलिसांनी अधिकच दक्षता घेतली आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी टप्पा येथे आमदार भारत भालके, सहकार महर्षी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार नागेश पाटील, पंचायत समिती सभापती वर्षा बनसोडे आदींसह पंचक्रोशीतील मान्यवर आले होते़पंढरपूर गूढ आवाजाने हादरलेपंढरपूर : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी वैष्णवांची मांदियाळी पंढरीत जमत असताना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या गूढ आवाजाने सारेच संभ्रमात पडले़खूप लांब एखादा स्फोट व्हावा त्यामुळे मोठा आवाज पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात झाला. त्यामुळे नागरिक घाबरून रस्त्यावर आले. मात्र हा आवाज नेमका कशाचा होता याची खात्रीशिर माहिती प्रशासनाकडे नसल्याने प्रत्येक जण तर्कवितर्क करीत होता. यापूर्वी अशा पद्धतीचा आवाज पंढरपुरात कधीच आला नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. याबाबत भूगर्भशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडकबाळकर म्हणाले की, केवळ २५ किमी अंतराच्या परिसरात जर हा आवाज असेल तर तो जमिनीच्या खालून आला नसावा. कारण भूकंप इतक्या कमी अंतरामध्ये होत नसतो. त्याची व्याप्ती मोठी असते. मात्र जवळपास एखाद्या खानकामात स्फोट सुरू असतील व त्याची तीव्रता वाढली असेल तर त्यामुळे तसा आवाज येऊ शकतो. शिवाय हा आवाज आकाशातूनसुद्धा आलेला असू शकेल.भारतीय वायू सेनेचे अल्ट्रॉसॉनिक विमाने आकाशातून नेहमीच जात असतात. वैमानिकाने विमान प्रमाणापेक्षा खाली आणून पुन्हा चटकन वर नेले असेल तर वायूच्या दाबामुळे पंधरा-वीस किलोमीटरच्या पट्ट्यात तसा आवाज येऊ शकतो. नागरिकांनी घाबरू नयेहा आवाज भूकंपाचा नाही. केवळ दहा-पंधरा किमीच्या पट्ट्यात झालेल्या या आवाजाची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असून नागरिकांनी घाबरू नये व अफवा पसरवू नये, असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पंढरपुरासमीप आल्या भक्तिगंगा!
By admin | Updated: July 13, 2016 03:48 IST