गेल्या आठवड्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी धर्म विचारून ओळख पटवून नंतर हत्या केल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली होती. त्यावरून एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच दुसरीकडे या मुद्यावरून राजकारणाही तोंड फुटलं आहे. याचदरम्यान, राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘’धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’ असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे. तसेच या हल्ल्यावरून वडेट्टीवार यांनी काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आणि सरकारच्या अपयशावरही बोट ठेवले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या प्रकरणात वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण असं घडल्याचं सांगत आहेत. तर काही जण असं घडलं नसल्याचं सांगत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, पहलगाममध्ये जे काही घडलं आहे त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती. २०० किमी आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं? याबाबत कुणी काही बोलत नाही आहे. या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. सरळ सरळ दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, अशाप्रकारच्या बाता मारून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दहशतवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांना पकडून कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण देशभरात हीच भावना आहे. मात्र लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.