मंचर : पावसाअभावी घोडनदीचे पात्र अक्षरश: कोरडे पडले असून पाणीसाठे जवळजवळ संपत चालले आहेत. वडगाव काशिंबेग येथील पद्मावती कुंड पाणी संपल्याने प्रथमच कोरडा पडू लागला असून त्यात थोडेसे पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पर्यटक या कुंडावर भेटी देऊन कुंडातील रांजणखळगी, कपारी आवर्जून पाहत आहेत.मंचर शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. पाण्याचे इतर साठे संपल्याने मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने पद्मावती कुंडातील पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. दोन पंपांच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. त्यामुळे पद्मावती कुंडातील पाणी झपाट्याने संपत चालले असून आता तळ दिसू लागला आहे. प्रथमच कुंडाच्या आतील भागाचे दर्शन झाले आहे. कुंडात थोडासाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाऊस अजून लांबला व पाणीउपसा असाच सुरू राहिला तर कुंडातील पाणी संपण्याची शक्यता माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, कुंडातील पाणीसाठा कमी झाल्याने आतील भोवरे, कपारी व पाण्यामुळे झालेल्या विविध आकृत्या हे पर्यटकांचे आकर्षण बनू लागले आहे. परिणामी कुंड पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. ज्याला समजले तो आवर्जून कुंडावर येऊन तो पाहण्याचा आनंद लुटतो. गावातील वयस्कर मंडळी प्रथमच कुंडातील पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन कुंडाच्या आतील भाग पाहावयास मिळाल्याचे सांगतात. पद्मावती कुंडाबाबत त्यातील पाणी कधीच संपत नाही, असे सांगितले जाते. आता नक्की काय होते, ते येणाऱ्या दोन-चार दिवसांत समजणार आहे.जून महिना संपत आला तरी अद्याप पाऊस पडलेला नाही. घोडनदीपात्र अक्षरश: कोरडे पडले असून ठराविक ठिकाणीच पाणीसाठा शिल्लक आहे. घोडनदीतील डोह आटू लागल्याने पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला असून सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत पद्मावती मंदिराजवळ कुंड आहे. यापूर्वी हा कुंड पाण्याने भरलेला असायचा. त्यामुळे त्याची आतील रचना कोणालाच समजत नव्हती. पोहण्यास गेलेला तरुण बुडून मरण पावल्याची घटना मागे घडली होती.
पद्मावती कुंड प्रथमच पडले कोरडे
By admin | Updated: June 30, 2016 01:47 IST