विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भाजप वा शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. बडे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याने पवार कुटुंबाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. राणा जगजितसिंह हे आजारी असल्याने शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक ३१ आॅगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे चुलत बंधू अमल महाडिक हे दक्षिण कोल्हापूरचे भाजप आमदार आहेत. माजी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलिप सोपल हे २८ आॅगस्टला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत.