स्नेहा मोरे, मुंबईदहीहंडी उत्सवाचे बदललेले रूप, उत्सवाला मिळालेली प्रसिद्धी आणि ग्लॅमरचे वलय पाहता गोविंदा पथकांनी बालहक्क आयोगाच्या विरोधात केलेला संघर्ष हा केवळ पैशांच्या हव्यासापोटीच आहे, असा टीकेचा सूर समाजातील सर्व स्तरांतून व्यक्त होताना दिसला. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या विरोधात असणाऱ्या आणि ऐन संकटकाळात पथकांची साथ सोडणाऱ्या आयोजकांची घागर उताणी करण्यासाठी यंदा ‘बिनपैशांची हंडी’ साजरी करण्यात येणार आहे.गोविंदा पथके प्रसिद्धी आणि पैशांसाठी दहीहंडी उत्सवात सहभागी होतात, अशी टीका नेहमीच होते. त्यामुळे या पारंपरिक उत्सवावरील निर्बंध झुगारण्यासाठी गोविंदा पथकांनी लढा दिल्याचे काही ज्येष्ठ गोविंदांनी सांगितले. त्यामुळे ‘पैशांसाठी उत्सव’ या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी यंदा दहीहंडी उत्सवात कोणत्याही आयोजकांकडून पैशांचे बक्षीस न स्वीकारण्याच्या मन:स्थितीत गोविंदा पथके आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही वर्षांपासून मुंबईतच नव्हेतर ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी आयोजकांची गर्दी वाढली. लाखो-करोडो रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करून सेलीब्रिटींची रीघ लावून या आयोजकांनी आपली शानही वाढविली. मात्र यंदा निर्माण झालेला बालगोविंदांचा प्रश्न असो वा थरांवरील निर्बंध असो, अशा आणीबाणीच्या काळात याच आयोजकांनी गोविंदा पथकांची साथ सोडली. त्यामुळे या आयोजकांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या रोख बक्षिसांवर बहिष्कार घालण्याची भूमिका गोविंदा पथकांनी घेतल्याची माहिती आहे. परंतु त्याचबरोबर पैशांचे आमिष दाखवून गोविंदा पथकांना गळ घालणाऱ्या आयोजकांच्या विरोधातील हा लढा कायम ठेवून त्यांनी दिलेल्या लाखो-करोडो रुपयांच्या ‘लोण्या’वरही गोविंदा पथकांनी पाणी सोडण्याचा चंग बांधला आहे.
आयोजकांची ‘घागर’ करणार उताणी
By admin | Updated: August 16, 2014 03:03 IST