मंगरूळपीर : अल्प खर्चात भरघोस उत्पन्न मिळावे आणि दर्जेदार उत्पादित पीक मिळावे या उदात्त हेतूने शासनाने मागील सहा वर्षापूर्वी शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीवर भर द्यावा या संदर्भात गावोगावी जनजागृती अभियान राबविले होते. मात्र अलीकडच्या काळात कृषी अधिकार्यांच्या उदासीन धोरणामुळे हे अभियान बंद पडून तालुक्यातून सेंद्रीय शेती हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतीच्या अतोनात खर्चामुळे शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्येचे कारण लक्षात घेऊन शासनाने जनजागृती अभियानाचा उपक्रम हाती घेवून गावोगावी जाऊन शेतकर्यांना सेंद्रीय शेती फायदेशीर आहे याचे महत्व पटवून दिले. एवढेच नव्हे तर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक शेतकर्याने अल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणार्या सेंद्रीय शेतीवर विशेष भर देण्यात आला होता. वारंवार रासायनिक व कीटकनाशकांचा वापर केल्याने जमिनीची पोत बिघडून जमीन बंजर होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीचे अनेक फायदे लक्षात घेऊन तालुक्यातील गणेशपूर, पोटी, चांभई, कासोळा, तर्हाळा, येडशी, बेलखेड, मसोला, धोत्रा, घोटा, मंगळसा, वनोजा, खरबी या गावातील बहुतांश शेतकर्यांनी पुढाकार घेऊन सेंद्रीय शेती करण्याकडे कल वाढविला होता. यामध्ये विशेषत: कापूस, सोयाबीन, गहु, हरभरा आदी पीके सेंद्रीय पद्धतीने घेण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हाधिकारी करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गणेशपूर येथील शेतकर्यांनी सेंद्रीय पद्धतीने कापूस पीकविला होता. तेव्हा तेथील शेतकर्यांना बजारपेठेतील मूल्यापेक्षा ८00 रूपये जास्त दराने भाव मिळाला होता. सेंद्रीय शेतीला पुरक म्हणून अनेक गावामध्ये गांढूळ खत प्रकल्प देण्यात आले होते. यामधील गांडूळखताचे प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. यामध्ये कृषी अधिकार्याचे व शेतकर्याचे सातत्य नसल्यामुळे सद्यस्थितीत सेंद्रीय शेती तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीला अधिकार्यांची उदासीनता कारणीभूत ठरत असली तरी काही शेतकर्यांच्या मते सेंद्रीय शेतीच्या मालाला जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे सेंद्रीय शेती करण्याचे शेतकरी टाळत असल्याचे दिसून येते.
सेंद्रीय शेती हद्दपार !
By admin | Updated: May 28, 2014 23:36 IST