मुंबई : बहुचर्चित कोस्टल रोड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यांसारख्या प्रकल्पांमुळे समुद्रातील जैव विविधता आणि कोळीवाड्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याचा दावा करत या प्रकल्पांना महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने विरोध केला आहे. या प्रकल्पांसाठी सरकारकडून ‘सी.आर.झेड. कायदा २०११’मध्ये बदल करण्यात येत असल्याचा आरोप करीत समितीने याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.कोस्टल रोडमध्ये कफ परेड, कुलाबा, वरळी, चिंबय, खारदांडा, जुहूतारा, जुहू मोरागाव व वेसावा कोळीवाडा हे विभाग मोठ्या प्रमाणात बाधित होणार असल्याची माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. परिणामी, मच्छीमार समाज देशोधडीला लागणार असून, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल, असे कोळी यांचे म्हणणे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली तयार करण्यात येणाऱ्या स्मारकालाही कृती समितीने विरोध दर्शवला आहे. भराव टाकून स्मारक उभारल्यास समुद्रातील जैव विविधता नष्ट होण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)कुटुंबासह आंदोलनसरकारने प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केल्यास मच्छीमार सहकुटुंब रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा समितीने दिला. गोराई ते कुलाबा जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे.
कोस्टल रोडला कोळी बांधवांचा विरोध
By admin | Updated: July 14, 2015 01:26 IST