ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मी हिंदूंच्या विरोधात नसून हिंदूत्वाच्या विरोधात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदूत्ववादी विचारधारा देशासाठी घातक असून शेवटच्या श्वासापर्यंत मी याला विरोधच करणार असे प्रतिपादन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केले. मुस्लीम तरुणांनी इसिससारख्या दहशतवादी संघटनांकडे जाण्याऐवजी राजकारणात येऊन न्यायासाठी लढा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचे रोखठोक मतं मांडली. ओवेसी म्हणाले, मी एक सच्चा भारतीय असून आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही हिंदूविरोधी नाही तर हिंदूत्वाच्या विरोधात आहोत. एमआयएम व भाजपा एकत्र असल्याच्या आरोपांचांही ओवेसी यांनी समाचार घेतला. एमआयएमने सात वर्ष यूपीएला पाठिंबा दिला होता. आता त्यांना पाठिंबा दिला तर मी भाजपाच्या सोबत गेलो असा आरोप होतेय याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आम्ही रझाकार व जिनांना मानत नाही. माझ्या पूर्वजांचे भारतमातेशी प्रेम होते. म्हणूनच आम्ही भारतात थांबलो अशी आठवणही त्यांनी करुन दिली. मी धर्मनिरेपक्ष असल्याचे काँग्रेसकडून व राष्ट्रप्रेमी असल्याचे शिवसेना - भाजपाकडून प्रमाणपत्रं घेऊ का असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. भारताचे भले झाल्यास मुसलमानांचेही भले होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.