मुंबई-ठाण्यात विकासदूतांनाच संधी - केशव उपाध्ये

By केशव उपाध्ये | Published: April 14, 2024 10:01 AM2024-04-14T10:01:17+5:302024-04-14T10:03:14+5:30

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महायुतीच्या कामांचा पाढा वाचला.

Opportunity for developers in Mumbai-Thane says keshav upadhye | मुंबई-ठाण्यात विकासदूतांनाच संधी - केशव उपाध्ये

मुंबई-ठाण्यात विकासदूतांनाच संधी - केशव उपाध्ये

केशव उपाध्ये मुख्य प्रवक्ते, भाजप (महाराष्ट्र)
मुंबई आणि ठाणे हा राज्यातला सर्वाधिक नागरीकरण झालेला भाग असून भारतासोबत किंबहुना त्याहीपेक्षा अधिक वेगाने बदल आत्मसात करण्याची या भागातल्या नागरिकांची सवय आहे. विकासाच्या नावाखाली काहीतरी थातूरमातूर बदल सहन करत आलेल्या या भागातल्या मतदारांनी २०१४ पासून वेगवान विकासाचा आणि, मधली अडीच वर्षे, लोकप्रतिनिधी नीट निवडले नाहीत तर विकासाच्या वेगाला कशी खीळ बसू शकते याचाही अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे मिळून लोकसभेच्या दहा जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील त्यात मुळीच शंका नाही. लोकल रेल्वेसेवा ही मुंबई आणि सभोवतालच्या आठ महापालिकांतील नागरिकांची जीवनदायिनीच आहे. 

या सेवेचा विस्तार आणि त्याचे अपग्रेडेशन गेल्या दहा वर्षांत वेगाने होताना साऱ्या नागरिकांनी अनुभवले आहे. नवी स्थानके तयार झाली, हार्बरसारख्या सेवांचा विस्तार झाला, तांत्रिक आवश्यकतांची पूर्तता झाली आणि लोकल मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा-सुविधा असायला हव्यात हा महायुती सरकारचा आग्रह आहे. धारावीसारख्या क्षेत्राच्या पुनर्विकासासह अनेक जुन्या वसाहती, इमारती यांचा तोंडवळा बदलून त्यांना आधुनिक रूप देण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे. सर्वांगीण विकासाला गवसणी घालणाऱ्या लोकाभिमुख निर्णयांमुळे मुंबई-ठाणे परिसरातील नागरिक महायुतीसोबतच ठाम राहतील, यात शंका वाटत नाही.

गाड्या वेगवान, आरामदायी व वातानुकुलितही झाल्या, त्याच्या जोडीलाच मेट्रोचे जाळेही विस्तारताना लोकांना दिसत आहे. विकासाच्या शत्रूनी मुंबईतील वेगवान व आरामदायी वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला भुयारी मेट्रो प्रकल्प अडवून ठेवला आणि करदात्यांचे हजारो कोटी रुपयेही वाया घालवले. अटल सेतूच्या रूपाने मुंबईच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. नव्याने खुला झालेला
भुयारी मार्ग मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील बदलांची नांदी आहे.

बदलांचे हे वारे फक्त वाहतुकीपुरते मर्यादित नाहीत. सीसीटीव्हीच्या जाळ्याने आणि पोलिस सुधारणांमुळे खंडणीखोरांची सत्ता संपवीत नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. झोपडपट्टीधारकांना अडीच लाखात घर, वसाहतींच्या सहज पुनर्विकासासाठीचे नवे धोरण अशी लोकाभिमुख धोरणे आणून महायुतीने मुंबईतील लक्षावधी नागरिकांच्या घरांचा प्रश्न सोडवला आहे. पूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली म्हाडा वसाहतींतील लक्षावधी नागरिकांची वाढीव मालमत्ता कर बिलेही महायुतीने रद्द केली. हे सारे करीत असतानाच मुंबई आणि परिसराची ऐतिहासिक वैशिष्ट्ये जपण्याचा, ती अत्याधुनिक तंत्राच्या साह्याने नव्या रूपात जगासमोर सादर करण्याचा प्रयत्नही महायुती सरकार करत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच गोराई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्यांवर आधारित एक वस्तुसंग्रहालय विकसीत केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई बंदरासारख्या प्राचीन वास्तू त्यांच्या मूळ रूपात जतन करण्याचे प्रयत्न हेही याचाच भाग आहेत.

Web Title: Opportunity for developers in Mumbai-Thane says keshav upadhye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा